कोरोनाच्या नव्या ‘पिरोला’ प्रतिरूपाने चिंता! | पुढारी

कोरोनाच्या नव्या ‘पिरोला’ प्रतिरूपाने चिंता!

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : कोरोनाचे मळभ दूर झाल्याने संपूर्ण जगभरातील नागरिकांनी निःश्वास सोडला असला, तरी कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट सध्या अमेरिका, युरोप आणि चीनमध्ये चिंतेचा विषय ठरला आहे. ‘पिरोला’ अथवा ‘बीए.2.86’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या कोरोनाच्या या प्रतिरूपाची संसर्गक्षमता वेगवान आहे. यामुळे भारतीयांसाठी तो किती उपद्रवी आहे, याविषयी भारत सरकार सतर्क झाले आहे. या प्रतिरूपाविरुद्ध रणनिती ठरविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची बैठक सोमवारी होत आहे. या बैठकीत पिरोलाचे उपद्रवमूल्य जोखून त्यावर उपाययोजना निश्चित केल्या जातील.

भारतातील ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञांच्या मते कोरोनाचे हे नवे विषाणूरूप सौम्य उपद्रवमूल्याचे म्हणून ओळखले जात असले, तरी त्याच्या रचनेत मात्र वेगाने बदल होतात आणि तो रुग्णाला गंभीर वळणावरही नेऊन ठेवू शकतो. डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे प्रतिरूपात बदल करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. डेल्टा व्हेरिएंटने जगभरात लक्षावधी नागरिकांचा बळी घेतला होता. ही बाब लक्षात घेऊनच सध्या विषाणूतज्ज्ञ त्याविषयी अधिक संशोधन करीत आहेत. भारतामध्ये अद्याप त्याचा प्रादुर्भाव दिसलेला नाही. यामुळे याचा अभ्यास करण्यासाठी अल्प प्रमाणात नमुने उपलब्ध आहेत. या नमुन्यांच्या संख्येवरून या विषाणूच्या नव्या रूपाच्या तीव्रतेविषयी अंदाज काढणे अशक्य असले, तरी याविषयीची अधिक माहिती उपलब्ध करून एक अहवाल सोमवारी होणार्‍या बैठकीपुढे ठेवला जाईल, अशी माहिती आहे.
प्रतिकारशक्ती वेगाने कमी होते

‘पिरोला’ या नव्या रूपाने सध्या डेन्मार्क, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, इंग्लंड आणि इस्रायल या देशांत प्रादुर्भाव दाखविला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हा विषाणू 35 प्रतिरूपांमध्ये (म्युटेशन्स) रूपांतरित होऊ शकतो. अंगावर वळ उठणे, डोळ्यांत संसर्ग होणे, अतिसार, ताप, खोकला, श्वास घ्यायला अडचण, नैराश्य, अंगदुखी, डोकेदुखी, चव आणि वास जाणे आणि घशाचा संसर्ग ही या विषाणूंच्या संसर्गाची काही प्राथमिक लक्षणे समोर आली आहेत. या विषाणूतील प्रथिने रुग्णाची प्रतिकारशक्ती झपाट्याने कमी करतात. प्राथमिक अवस्थेत कोरोनावर प्रचलित असलेल्या लसीला ते कमी जुमानतात, असे निदर्शनास आल्यामुळे गणेश उत्सवाच्या आगमनापूर्वीच प्रशासकीय यंत्रणेवर चिंतेचे नवे ढग जमा होऊ लागले आहेत.

Back to top button