Delhi Murder Case : ॲमेझॉन मॅनेजर हत्याकांड; मुख्य आरोपीसह आणखी एकाला अटक | पुढारी

Delhi Murder Case : ॲमेझॉन मॅनेजर हत्याकांड; मुख्य आरोपीसह आणखी एकाला अटक

पुढारी ऑनलाइन डेस्क : Delhi Murder Case : दिल्लीच्या भजनपुरा येथे मंगळवारी मध्यरात्री गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ॲमेझॉनच्या सीनियर मॅनेजरचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडातील मुख्य आरोपीसह आणखी एकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य आरोपींच्या अटकेचे प्रयत्न सुरू असून आणखी तपास केला जात आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

हरप्रीत गिल (वय 36 रा. पुत्र कर्नल सिंह रहिवासी सी-35, गल्ली क्रमांक 1, भजनपुरा) असे हत्या झालेल्या ॲमेझॉनच्या सीनियर मॅनेजरचे नाव आहे. तर गोविंद सिंह, हरप्रीत गिलचे मामा (वय 32, रा. पुत्र बसंत सिंह रहिवासी सी-35, गल्ली क्रमांक 1. भजनपुरा) हा या हल्ल्यात जखमी झाला होता.

घटना भजनपुराच्या गल्ली क्रमांक 8 जवळ घडली होती. माहितीनुसार, रात्री उशिरा हरप्रीत गिल आणि गोविंद सिंह हे दोघे गल्ली क्रमांक 8 जवळ बाइकवर होते. त्याचवेळी एक स्कूटी आणि एक बाइकवर स्वार पाच तरुणांनी त्यांना अडवले. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळून गेले होते. या हल्ल्यात हरप्रीतचा मृत्यू झाला होता तर गोविंद सिंह जखमी झाला होता.

Delhi Murder Case : आरोपी मल्लूला अटक

भजनपुरा हत्याकांडप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. 29 ऑगस्ट रोजी पहाटे 2.00 वाजताच्या सुमारास सिग्नेचर ब्रिजजवळ आरोपीला पकडण्यात आले. त्यानंतर मुख्य आरोपीलाही अटक करण्यात आली.

बिलाल गनी उर्फ मल्लू (पुत्र मो. शाद निवासी बी-241/6, गल्ली क्रमांक 19/20, सुभाष मोहल्ला, भजनपुरा) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपीविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, बिलाल गनी उर्फ ​​मल्लू काही दिवसांपूर्वीच १८ वर्षांचा झाला. त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. गांजा ओढण्याच्या सवयीमुळे त्याला ‘मल्लू’ हे टोपणनाव पडले. 5 भावंडांमध्ये तो सर्वात मोठा आहे. तो उत्तर घोंडा, भजनपुरा येथे वेल्डिंगच्या दुकानात काम करतो. एएनआयने X वर (पूर्वीचे ट्विटर) याविषयी पोस्ट केले आहे.

Delhi Murder Case : मॅनेजर हरप्रीतचे बंगळूरला झाले होते प्रमोशन

हरप्रीत गेल्या 14 वर्षांपासून ॲमेझॉनमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर कार्यरत आहे. तो दिल्लीतील जखीरा येथील कार्यालयात कार्यरत होता. अमर उजालाच्या माहितीनुसार, हरप्रीतच्या एका नातलगाने सांगितले की, हरप्रीतला प्रमोशन मिळाले होते आणि तो पुढच्या आठवड्यात बंगळूरच्या कार्यालयात रुजू होणार होता. हरप्रीतच्या पाठीमागे त्याचे आई स्वर्णदीप कौर वडील कर्नल सिंह आणि एक लहान भाऊ सन्नी गिल असा त्याचा परिवार आहे. दरम्यान घटनेनंतर हरप्रीतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला. हरप्रीतवरील हल्ल्याची माहिती मिळताच लहान भाऊ सन्नी याने घटनास्थळी धाव घेतली. मात्र या दरम्यान त्याला दुखापत झाली. तर त्याचे आई आणि वडील दोघेही हरप्रीतच्या मृत्यूच्या बातमीने बेशुद्ध होऊन पडले होते.

तर या हल्ल्यात हरप्रीतसह असलेल्या त्याचा मामा गोविंद सिंह हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोविंद सिंहची भजनपुराच्या मार्केटमध्ये हंग्रीबर्ड नावाने मोमोज चे दुकान आहे. मंगळवारी घटनेच्या रात्री हरप्रीत आपल्या घरी परतला होता. तर नंतर 11 वाजता मामा गोविंदसह कामानिमित्त दोघेही बाहेर गेले होते. त्यानंतर परतत असताना आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला.

Delhi Murder Case : हत्येचे नेमके कारण काय?

या गोळीबारीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास हरप्रीत आणि गोविंदसिंह घरी परतत असताना त्यांचे स्कूटी आणि बाइकवरून जाणाऱ्या काही मुलांसोबत त्यांचे विवाद झाले होते. त्यानंतर या मुलांनी पिस्तुल काढून दोघांच्या कानपट्टीच्या जवळ गोळ्या झाडल्या आणि फरार झाले.

त्यांना लुटण्याचा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचे जिल्हा पोलीस उपायुक्त डॉ.जॉय तिर्की यांचे म्हणणे आहे. कुटुंबीयांनी कोणताही व्यवहार आणि शत्रुत्व नाकारले आहे. आरोपींची ओळख पटली आहे. ते लवकरच पकडले जातील.

Delhi Murder Case : परिसरातील गुन्हेगार समीरचे नाव समोर आले

या खून प्रकरणात परिसरातील प्रसिद्ध गुन्हेगार समीर उर्फ ​​मायाचे नाव समोर आले आहे. घटनेच्या वेळी तो त्याच्या मित्रांसह तेथून जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याच्या स्कूटीला हरप्रीतच्या दुचाकीला स्पर्श झाला. यानंतर त्याने आणि त्याच्या साथीदारांनी दोघांवर गोळ्या झाडल्या.

हे ही वाचा :

Back to top button