Chandrayaan-3 : देशभरात उत्कंठा, कुतूहल आणि प्रार्थना… | पुढारी

Chandrayaan-3 : देशभरात उत्कंठा, कुतूहल आणि प्रार्थना...

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या 40 दिवसांपासून प्रत्येक भारतीय ज्या ऐतिहासिक प्रसंगाची वाट पाहात आहे, ते चंद्रारोहण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. आज (दि.२३) सायंकाळी निर्धारित वेळेनुसार सहा वाजून चार मिनिटांनी भारताचे ‘चांद्रयान’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले यान भारताचे असणार आहे. तसेच चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. (Chandrayaan-3 Moon Landing Live Updates) देशभरातून विविध स्वरुपात चांद्रयान-३ साठी भावना व्यक्त केल्या जात आहेत.

कपिलेश्वर मंदिरामध्ये चांद्रयान मोहिमेसाठी प्रार्थना

श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी आज पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासून शतरुद्राभिषेक, विशेष रुद्र पठण व पंचामृत अभिषेक करण्यात आला. इस्रो चांद्रयान मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संशोधक व सहकार्यांना यश लाभावे, म्हणून विशेष प्रार्थना करण्यात आली.

Chandrayaan-3 : ‘मून अँथम’

कवी अभय के यांनी ‘मून अँथम’ लिहिले आहे. जगप्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार डॉ. एल सुब्रमण्यम नंतर ‘मून अँथम’ साठी ट्यून सेट करतील आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यात गायन करतील.

अभयने सूर्यमालेतील सर्व ग्रहांवर गीते लिहिली आहेत. त्यांचे ‘पृथ्वीगीत’ जागतिक स्तरावर बोलल्या जाणार्‍या १५० हून अधिक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे आणि दरवर्षी ‘पृथ्वी दिन’ आणि ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गायले जाते. बुधवारी चंद्रावर लँडिंगच्या प्रयत्नाबाबत अभय म्हणाले, “भारताचे चांद्रयान-3 लँडर लवकरच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे ही खूप अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. सव्वाशे कोटी भारतीयांसाठी हे स्वप्न साकार होणार आहे. मला आशा आहे की ‘मून अँथम’ मानवतेला आपल्या सर्वात जवळच्या खगोलीय पिंडाशी जोडण्यास मदत करेल.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिषेक

भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी, या मोहिमेत भारताच्या शास्त्रज्ञांना यश मिळावे यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरात आज पहाटे भालचंद्र गणेशास अभिषेक करण्यात आला. यासाठी दूध, दही, विविध फळांचे रस, सुकामेवा आदींचा वापर करण्यात आला. आज संध्याकाळी भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. त्याचे लँडिंग सुरक्षित व्हावे यासाठी हा अभिषेक करण्यात आला याशिवाय गणपती बाप्पांचा मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आले. मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करण्यात आली. मिलिंद राहूरकर गुरुजी यांच्या पौरहित्यखाली हा अभिषेक करण्यात आला.

भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्य

नागपूरची भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्यांगना पूजा हिरवाडे हिने ‘नमो नमो भारताम्बे’ आणि चांद्रायन गीतावर भरतनाट्यम सादर केले आहे. माध्यमांशी बोलताना तिने सांगितले की,” “भारताचे चांद्रयान-३ आज चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळे हा क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी मी चांद्रयान गीतावर भरतनाट्यम सादर केले. संपूर्ण भारतासाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. ज्यांच्या मेहनतीने आज हे शक्य झाले त्या सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक आभार.”

Chandrayaan-3 : पूजा-हवन

उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी काही साधुंनी साधू हवन केले आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या कृतीवर सोशल मीडिावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान चांद्रयान-३ यशस्वी लँडिंगसाठी न्यू जर्सी येथील साई बालाजी मंदिर येथे प्रार्थना केली जात आहे. भारतीय-अमेरिकन समुदायाचे सदस्य म्हणतात, “आमच्या सर्व भारतीय समुदायासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आशा आहे, सर्व काही ठीक होईल. चांद्रयान टीमला शुभेच्छा.”

मध्य प्रदेशमध्ये चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी विशेष प्रार्थना करण्यासाठी छतरपूरमधील बागेश्वर धाम येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. भक्त, राजीव शर्मा माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “हजारो भक्त प्रार्थना करण्यासाठी येथे आले. यावेळी चांद्रयानच्या यशासाठी येथे विशेष प्रार्थना करण्यात आली आहे”

सुदर्शन पटनायक यांनी केले वाळू शिल्प 

आंतरराष्ट्रीय वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी चांद्रयान-3 च्या यशस्वी चंद्र लँडिंगसाठी अमेरिकेतील डेनवर, कोलोरॅडो येथे एक सूक्ष्म वाळू शिल्प तयार केले आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे.

Chandrayaan-3 : लँडिंगचा क्षण लाईव्ह पाहण्याची संधी

चांद्रयानाचे लँडिंग पाहता येणार आहे. इस्रो आज (दि.२३) सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी आपल्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स अर्थात मुख्य नियंत्रण कक्षातून थेट प्रक्षेपण करणार आहे.

इस्रोचे यू ट्यूब चॅनल, इन्स्टाग्राम, एक्स खाते ट्विटर) आणि फेसबुक पेजवरून ते सर्वांना पाहता येणार आहे. इस्रोच्या वेबसाईटवरही क्षणाक्षणाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हे ही वाचा :

Back to top button