चंद्र फक्त ११३ कि.मी. दूर, लँडरने पाठवली छायाचित्रे | पुढारी

चंद्र फक्त ११३ कि.मी. दूर, लँडरने पाठवली छायाचित्रे

बंगळूर; वृत्तसंस्था : ‘चांद्रयान-3’चे लँडर आता चंद्राच्या 113 बाय 157 कि.मी.च्या कक्षेत आले आहे. लँडरचे चंद्रापासून किमान अंतर 113 कि.मी. आणि कमाल अंतर 157 कि.मी. आहे, असा त्याचा अर्थ होय. लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रेही ‘इस्रो’कडे पाठविली आहेत.

‘इस्रो’ने डिबूस्टिंगच्या माध्यमातून चांद्रयानाची कक्षा कमी केली. डिबूस्टिंग म्हणजे स्पेसक्राफ्टचा वेग कमी करणे होय. ‘इस्रो’ आता रविवारी पहाटे 2 वाजता दुसरे डिबूस्टिंग पार पाडेल. तद्नंतर चंद्रापासून लँडरचे किमान अंतर 30 कि.मी., तर कमाल अंतर 100 कि.मी. असेल. पुढे बुधवारी संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी (आपल्याकडील वेळेनुसार) लँडर जेव्हा चंद्रापासून सर्वात कमी अंतरावर असेल, तेव्हा सॉफ्ट लँडिंगची (चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा) संधी घेतली जाईल. लँडिंग प्रक्रियेच्या सुरुवातीला, सेकंदाला सुमारे 1.68 कि.मी. असेल. थ्रस्टरच्या मदतीने तो कमी कमी करत नेत सुरक्षितपणे पृष्ठभागावर उतरवले जाईल.

सध्या चंद्रावर रात्र आहे आणि ती मंगळवारपर्यंत कायम राहील. बुधवारी चंद्रावर सूर्योदय होईल. दिवस उजाडेल… लँडिंगसाठी त्या आसपासची संधी घेतली जाईल. कारण, पुढे प्रज्ञान रोव्हरला अनेक अशी कामे (संशोधने) करायची आहेत, ज्यासाठी उजेड आवश्यक आहे. पुढे चौदा दिवस ते सुरू राहील.

डिबूस्टिंग प्रक्रिया काय?

लँडरच्या चार चाकांजवळ जोडलेल्या 800 न्यूटन पॉवरच्या 1-1 थ्रस्टरच्या (इंजिन) मदतीने डिबूस्टिंग प्रक्रिया पार पडते. प्रत्येकी 2 थ्रस्टर 2 टप्प्यांत काम करतात आणि स्पेसक्राफ्टचा वेग कमी कमी करत नेला जातो.

आता खरा सामना सुरू झाला आहे. हे अखेरचे षटक आहे. ‘चांद्रयान-3’ला सॉफ्ट लँडिंगसाठी 90 अंशात फिरवावे लागेल.
– एम. अन्नादुराई, प्रकल्प संचालक, ‘चांद्रयान-3’, बंगळूर

  •  कक्षाकुंचन प्रक्रियेनंतर पुढील 5 दिवस लँडर या नव्या कक्षेत राहील.
  • 2 बुधवारी (23 ऑगस्ट) सायंकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागापासून 30 कि.मी. अंतरावरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

Back to top button