स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी 1800 विशेष निमंत्रित | पुढारी

स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी 1800 विशेष निमंत्रित

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  15 ऑगस्ट रोजी साजर्‍या होणार्‍या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून रविवारी या सोहळ्याची संपूर्ण रंगीत तालीम घेण्यात आली. मंगळवारी लाल किल्ल्यावर होणार्‍या या नितांतसुंदर व वैभवी सोहळ्याला हजर राहणार असलेल्या 1800 विशेष निमंत्रितांची यादी सरकारने जाहीर केली असून त्यात भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या देश-विदेशातील व्यक्तींचा समावेश आहे.

स्वातंत्र्य दिन सोहळ्याची मागील काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी पूर्ण झाल्यानंतर रविवारी फुल ड्रेस रिहर्सल म्हणजेच संपूर्ण रंगीत तालीम घेण्यात आली. त्यात पोलिस, निमलष्करी दले, लष्कर, नौदल व हवाई दलाची पथके सहभागी झाली होती. तिन्ही दलांच्या वाद्यवृंदांनीही त्यात सहभाग घेतला. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी असणार्‍या सुरक्षा व्यवस्थेचीही चाचणी घेण्यात आली.

सरकारच्या वतीने रविवारी मंगळवारच्या सोहळ्यासाठी 1800 विशेष निमंत्रितांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तींचा समावेश आहे. आदर्श गावांचे सरपंच, शिक्षक, नर्स, शेतकरी, मच्छीमार, राजधानीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उभारणीत योगदान देणारे मजूर, खादी उत्पादक श्रमिक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शालेय शिक्षक, अमृत सरोवर आणि हर घर जल योजनांचे कर्मचारी, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे कर्मचारी यांचा समावेश आहे.

Back to top button