No-confidence Motion Debate: लालबहादूर शास्त्री यांच्या सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर झाली होती सर्वाधिक 24 तास चर्चा | पुढारी

No-confidence Motion Debate: लालबहादूर शास्त्री यांच्या सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर झाली होती सर्वाधिक 24 तास चर्चा

सागर पाटील

नवी दिल्ली, मोदी सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली असून ही चर्चा किती काळ चालते, याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. याआधीच्या इतिहासावर नजर टाकली तर 1964 साली तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर (No-confidence Motion Debate)  तब्बल चोवीस तास चर्चा चालली होती.

मोदी – 1 सरकारच्या कार्यकाळात 2018 साली तेलगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर 12 तास चर्चा झाली होती. विरोधकांच्या बाजुने त्यावेळी 126 मते पडली होती तर सरकारच्या बाजुने 325 मते पडली होती. अशा प्रकारे 199 मतांनी मोदी सरकारचा त्यावेळी विजय झाला होता.

No-confidence Motion Debate : पहिला अविश्वास प्रस्ताव जवाहरलाल नेहरु सरकारविरोधात

इतिहासावर नजर टाकली तर पहिला अविश्वास प्रस्ताव जवाहरलाल नेहरु सरकारविरोधात 1963 साली दाखल झाला होता. चीनकडून झालेल्या पराभवानंतर आचार्य कृपलानी यांनी हा प्रस्ताव दाखल केला होता. त्यावेळी सरकारच्या बाजुने 347 तर विरोधकांच्या बाजुने 62 मते पडली होती. 1964 साली एस. एन. द्विवेदी यांनी शास्त्री सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावेळी सरकारच्या बाजुने 315 तर विरोधकांच्या बाजुले 44 मते पडली होती. 1965 साली तत्कालीन स्वतंत्र पार्टीचे नेते एम. आर. मसानी यांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावेळी सरकारच्या बाजुने 318 तर विरोधकांच्या बाजुने 66 मते पडली होती.

इंदिरा गांधी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव 1966 साली भाकपच्या हिरेंद्रनाथ मुखर्जी यांनी दाखल केला

काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांच्या सरकारविरोधात पहिला अविश्वास प्रस्ताव 1966 साली भाकपच्या हिरेंद्रनाथ मुखर्जी यांनी दाखल केला होता. त्यानंतर 1975 पर्यंत अनेकदा गांधी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाले. ज्या विरोधी नेत्यांनी हे प्रस्ताव दाखल केले होते, त्यात यु. एम. त्रिवेदी, अटलबिहारी वाजपेयी, मधू लिमये, बलराज मधोक, कंवरलाल गुप्ता, पी. राममूर्ती आणि ज्योर्तिमय बसू यांचा समावेश होतो. बसू यांनी सर्वात जास्त प्रस्ताव गांधी सरकारविरोधात दिले होते.

No-confidence Motion Debate: यशवंतराव चव्हाण यांचा देसाई सरकारविरोधात प्रस्ताव दाखल

आणीबाणीनंतर जनता दलाचे मोरारजी देसाई पंतप्रधान बनले. पण 1978 मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते सी. एम. स्टीफन यांनी त्यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. आवाजी मतदानात हा प्रस्ताव पडला. त्याच्या दुसऱ्याच वर्षी 1979 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी देसाई सरकारविरोधात प्रस्ताव दिला. प्रस्तावावरची चर्चा पूर्ण होण्याआधीच देसाई यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि हे सरकार कोसळले.

इंदिरा गांधी सरकारविरोधात 1981 साली जाॅर्ज फर्नांडिस यांचा अविश्वास प्रस्ताव दाखल

त्यानंतर सत्तेत आलेल्या इंदिरा गांधी सरकारविरोधात 1981 साली जाॅर्ज फर्नांडिस यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. प्रस्तावाच्या बाजुने 92 तर सरकारच्या बाजुने 278 मते पडली. यानंतर सलग दोनदा गांधी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाले. दोन्ही वेळा सरकार वाचविण्यात इंदिरा गांधी यांना यश आले. राजीव गांधी सरकारविरोधात 1987 साली अविश्वास प्रस्ताव दाखल झाला होता. सी. माधव रेड्डी यांनी दाखल केलेला हा प्रस्ताव आवाजी मतदानाने नामंजूर झाला होता.

1992 साली नरसिंहा राव सरकारविरोधात दोनदा अविश्वास प्रस्ताव दाखल झाले.

1992 साली नरसिंहा राव सरकारविरोधात दोनदा अविश्वास प्रस्ताव दाखल झाले. हे प्रस्ताव भाजपच्या जसवंत सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखल केले होते. 1993 साली राव सरकारविरोधात तिसरा प्रस्ताव दाखल झाला. पण यावेळीही विरोधकांना पराभव पत्करावा लागला. 2003 साली तत्कालीन वाजपेयी सरकारविरोधात सोनिया गांधी यांनी अविश्वास प्रस्ताव दिला. 21 तासांच्या चर्चेनंतर प्रस्तावावर मतदान झाले. यात सरकारच्या बाजुने 314 तर विरोधकांच्या बाजुने 189 मते पडली होती.

हेही वाचा 

 

Back to top button