No-Confidence Motion | अविश्वास प्रस्तावावर आजपासून सलग ३ दिवस चर्चा, काँग्रेसतर्फे सर्वप्रथम राहुल गांधी बोलणार? | पुढारी

No-Confidence Motion | अविश्वास प्रस्तावावर आजपासून सलग ३ दिवस चर्चा, काँग्रेसतर्फे सर्वप्रथम राहुल गांधी बोलणार?

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज मंगळवार (दि. ८) पासून सलग तीन दिवस चर्चा होणार आहे. या चर्चेला अंतिम दिवशी म्हणजे १० तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. दरम्यान, लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चा आज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. ही चर्चा सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालणार आहे. हे वेळापत्रक १० ऑगस्टपर्यंत ३ दिवस असेच राहील आणि शेवटच्या दिवशी दुपारी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावाला उत्तर देतील. (No-Confidence Motion)

सभागृहात एकट्या भाजपचे संख्याबळ ३०१ आहे. भाजपने त्यांच्या लोकसभा खासदारांना ७ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. तर मणिपूर मुद्यावर लोकसभेत अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान आज मंगळवारी राहुल गांधी काँग्रेसचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. काँग्रेसतर्फे सर्वप्रथम राहुल गांधी हे बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गांधी यांची खासदारकी बहाल झालेली आहे. त्यामुळे लोकसभेत ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावर संसदेत नियम २६७ अन्वये चर्चा घेतली जावी व त्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे, या मागणीसाठी विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभापासून आक्रमक भूमिका घेतली होती. सरकारने अल्पकालीन चर्चा घेण्याची तयारी दर्शवली होती. यावरुन मतभेद वाढल्यानंतर काँग्रेसने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. पक्षाचे खासदार गौरव गोगोई यांनी ५० खासदारांच्या सह्यांनिशी हा प्रस्ताव लोकसभा सचिवालयाकडे दिला होता. तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लगेचच २६ जुलैला हा प्रस्ताव स्वीकृत केला होता.

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेची तारीख निश्चित करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत चर्चा आणि मतदानासाठी ८ ते १० ऑगस्ट असा ३ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यातील शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी चर्चेला उत्तर देतील.

याआधीच्या अविश्वास प्रस्तावाचे काय झाले होते?

१६ व्या लोकसभेच्या कार्यकाळात जेव्हा तेलगू देसम पार्टीने अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. १२ तासांच्या चर्चेनंतर मोदी सरकारने हा प्रस्ताव १९९ मतांनी फेटाळला होता. त्यावेळी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला ३२५ मते मिळाली होती, तर विरोधी गटाला प्रस्तावाच्या बाजूने केवळ १२६ मते मिळाली होती. (No-Confidence Motion)

हे ही वाचा :

Back to top button