Stock Market Closing Bell | बाजारात विक्रीचा दबाव! सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावरून ५०५ अंकांनी खाली | पुढारी

Stock Market Closing Bell | बाजारात विक्रीचा दबाव! सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावरून ५०५ अंकांनी खाली

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आज शुक्रवारी (दि.७) देशांतर्गत बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. आज सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावरून ५०५ अंकांनी खाली येऊन ६५,२८० वर बंद झाला. तर निफ्टी १६५ अंकांच्या घसरणीसह १९,३३१ वर स्थिरावला. ऑटो आणि पीएसयू बँक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक एफएमसीजी, पॉवर, रियल्टी प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.८ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.२ टक्क्यांनी घसरला. (Stock Market Closing Bell)

अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, अपोलो हॉस्पिटल्स, इंडसइंड बँक आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज हे निफ्टीवर सर्वाधिक घसरले. तर टाटा मोटर्स, टायटन कंपनी, एम अँड एम, एसबीआय आणि भारती एअरटेल हे शेअर्स तेजीत राहिले.

सेन्सेक्स काल गुरुवारी ३३९ अंकांच्या वाढीसह ६५,७८५ वर बंद झाला होता. तर निफ्टी ९८ अंकांनी वाढून १९,४९७ वर स्थिरावला होता. या तेजीमुळे गुंतवणूकदार एका सत्रात सुमारे १.८ लाख कोटींनी श्रीमंत झाले होते. आज सेन्सेक्स ६५,५५९ वर खुला झाला. त्यानंतर तो ६५,३०० च्या खाली आला.

सेन्सेक्सवर आज पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, एलटी, एशियन पेंट्स, आयटीसी, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले. तर टाटा मोटर्स, टायटन, एम अँड एम, एसबीआय हे शेअर्स वाढले.

अदानी समुहातील सर्व १० शेअर्स आज घसरले. अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट्सचे शेअर्स सर्वाधिक २ टक्क्यांहून अधिक खाली आले. अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅसमध्ये १ टक्के घसरण दिसून आली. (Stock Market Closing Bell)

टायटनच्या तेजीमागे कारण काय?

टाटा समुहातील फॅशन आणि लाइफस्टाइल उत्पादनांचे किरकोळ विक्रेते टायटनचे शेअर्स (Titan shares) शुक्रवारी ३ टक्क्यांनी वाढून BSE वर ३,२११ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या जून तिमाहीतील व्यवसायातील आकडेवारीचे स्वागत केले आहे.

परदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीवर जोर कायम

परदेशी गुंतवणुकदारांनी (Foreign investors) भारतीय शेअर्सची खरेदी सुरूच ठेवली आहे. गुरुवारी त्यांनी २,६४१ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. पण देशांतर्गंत गुंतवणूकदारांचा (DII) नफा मिळवण्यासाठी विक्रीवर जोर राहिला आहे. त्यांनी काल एका दिवसांत २,३५१ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

आशियाई बाजारातही आज कमकुवत स्थिती राहिली. जपानचा निक्केई ०.४७ टक्के आणि हाँगकाँगचा हँगसेंग १.३ टक्क्यांनी घसरला.

 हे ही वाचा :

Back to top button