शेअर मार्केट समजावून घेताना... | पुढारी

शेअर मार्केट समजावून घेताना...

शेअर मार्केट समजावून घेताना शेअर मार्केटची दिशा दाखविणारे इंडिकेटर्स कसे काम करतात ते पाहू.

 मार्केट-कॅप आधारित निर्देशांक

काही निर्देशांक त्यांच्या बाजार भांडवलावर आधारित कंपन्या निवडतात. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे स्टॉक एक्स्चेंजमधील कोणत्याही सार्वजनिक व्यापार कंपनीचे बाजार मूल्य. SP BSE आणि लार्ज कॅप मिड कॅप NSE स्मॉल कॅप 50 सारखे निर्देशांक हे सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने सेट केलेल्या नियमांनुसार कमी बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांचा संग्रह आहे.

 इतर निर्देशांक

इतर अनेक निर्देशांक जसे की SP BSE 500, NSE 100, SP BSE 100, इतरांसह किंचित मोठे निर्देशांक आहेत. BSE 500 म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधील मार्केट कॅपिटलनुसार पहिल्या क्रमांकाच्या 500 BSE 100 म्हणजे पहिल्या 100 कंपन्यांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या मार्केट कॅपिटलनुसार निर्देशांक पहावयास मिळतात आणि त्यावर सूचीबद्ध केलेल्या स्टॉकच्या वेगवेगळ्या संख्येसह येतात.
शेअर्सची खरेदी-विक्री करताना खालील निर्देश पाहावेत.

1) उलाढालीचे प्रमाण – एखाद्या शेअर्सची पूर्ण एक दिवसात किती वेळा खरेदी आणि विक्री झाली आहे त्याचे उलाढालीचे प्रमाण पाहणे गरजेचे. जितकी उलाढाल जास्त तितकी तरलता जास्त आणि तो शेअर्स गुंतवणुकीसाठी चांगला असतो. एखाद्या शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे प्रमाण कमी असेल तर धोक्याचे असते. आपल्याकडे शेअर्स आहेत; पण तो शेअर्स कोण घ्यायला तयार नसेल तर आपले पैसे अडकून पडतात.

2) सर्वाधिक उचांक-नीचांक नफा-नुकसान – दररोज लाखो-करोडो रुपयांचे व्यवहार होत असतात. काही कंपन्यांचे चांगली न्यूज आली की शेअर्स एकदम वधारतो. खराब न्यूज आली की, एकदम आपटतो. आजच्या दिवशी कोणत्या कंपनीचा शेअर्स उच्च दराच्या स्तरावर गेला आहे म्हणजे त्याचा दर सर्वाधिक वाढला आहे आणि कोणत्या कंपनीचा दर खालच्या पातळीवर गेला आहे, सर्वाधिक नुकसान केले आहे, या गोष्टी पाहणे गरजेचे आहे. यावरून त्या शेअर्समध्ये तेजी येणार की मंदी येणार हे कळते.

3) 52 आठवड्यांतील उचांक आणि नीचांक – कोणता शेअर्स मागील वर्षभरात उच्च पातळीवर गेला आहे. कोणता शेअर्स खालच्या पातळीवर गेला आहे हे पाहता येते. समजा सेन्सेक्स किंवा निफ्टीमधील चांगला शेअर्स 52 आठवड्यांतील नीचांक पातळीवर आला असेल तर खरेदी करण्यासाठी संधी आहे हे समजते किंवा उच्च पातळीवर गेला असेल तर तो शेअर्स विक्री करून नफा कमविणे या गोष्टी लक्षात येतात.

4) खरेदी-विक्री बंद पडणे – काही अचानकपणे उद्भवणार्‍या प्रसंगामुळे एखाद्या शेअर्स किंवा अनेक शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री होत त्याला सर्किट लागले असे म्हणतात. सेबीच्या नियमानुसार काही कंपन्यांचे 5, 10, 15, 20 टक्के पर्यंत दर घसरला की तिथे खरेदी-विक्रीचा व्यवहार थांबविला जातो. काही जागतिक घडामोडी घडल्या की अचानक सर्वच कंपन्यांचे शेअर्स विक्रीचा मारा चालू होतो. अशा वेळी सेन्सेक्स किंवा निफ्टी निर्देशांक 10 टक्केपेक्षा जास्त खाली आले तर सेबी काही काळासाठी व्यवहार थांबविते म्हणजे सर्किट ब्रेक करते.

अस्थिरता आणि वृद्धी दर – शेअर मार्केट नेहमी खाली वर होत असते. एखाद्या वर्षी किंवा सलग दोन वर्षे तीन वर्षे सतत खाली किंवा वरच्या दिशेने जात असते म्हणून भांडवली बाजारात गुंतवणूक करताना दीर्घकाळासाठी करावे. अल्प काळासाठी जोखीमचे ठरते. नवीन गुंतवणूकदार गुंतवणूक करतो तेव्हा अनेक वेळा नुकसान करून घेत असतो. त्याला अस्थिरतेची जाणीव नसते. त्याला वाटते की सतत शेअर्स वाढला पाहिजे, पण असे होत नसते. खालील चार्ट पाहिल्यानंतर लक्षात येते की अस्थिरता आणि परतावा कसे मिळतात. एखाद्या वर्षी मार्केट खाली येते.

शेअर मार्केटमध्ये अस्थिरता प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळून येते. इथे गुंतवणूक करीत असताना कंपन्याचा अभ्यास करून दीर्घकालीन गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. अल्पकाळामध्ये केलेली गुंतवणूक निश्चितपणे फायदा होईलच असे सांगता येत नाही.

वरील चार्टचा अभ्यास केला तर आपल्या मार्केट मधील अस्थिरता लक्षात येते. मागील 13 वर्षांत फक्त तीन वेळा 2012, 2016 आणि 2020 मध्ये तोटा झालेला दिसतो. प्रत्येक वर्षी नफा झालेला दिसतो. पण दीर्घकालामध्ये तुम्हाला निश्चित स्वरूपात फायदा होतो हे कळते.
तेरा वर्षांपूर्वी ज्यांनी एक लाख गुंतवणूक केली आहे त्यांचे तेरा वर्षांत 3 लाख 92 हजार इतकी रक्कम झाली आहे. जवळपास चारपट रक्कम झाली आहे. आपला भांडवली बाजार येणार्‍या दहा वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या देशाकडे असल्याने निश्चित स्वरूपात शेअर मार्केटमध्ये अल्पकाळासाठी नसून दीर्घकालासाठी फायदा होणार आहे हे लक्षात घेऊन शेअर मार्केटमधले ज्ञान घेऊन गुंतवणूक केली तर तुम्ही निश्चितच यशस्वी होऊ शकता.
(उत्तरार्ध)

अनिल पाटील,
प्रवर्तक, एस पी वेल्थ, कोल्हापूर

Back to top button