ताशी 120 कि.मी. वेगाने आदळली कोरोमंडल एक्स्प्रेस | पुढारी

ताशी 120 कि.मी. वेगाने आदळली कोरोमंडल एक्स्प्रेस

बालासोर, वृत्तसंस्था : शुक्रवारची सायंकाळ ओडिशातून प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांसाठी जणू काळ बनून आली. बालासोर येथील बहानग बजार रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळी सातच्या सुमारास तीन रेल्वेगाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या महाभीषण दुर्घटनेत 300 प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वे गाड्यांच्या आघाताची तीव्रता एवढी होती की, कित्येक प्रवाशांचे मृतदेह डब्यांच्या खिडक्या फोडून बाहेर फेकले गेले. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत एक हजारहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही या शतकातील सर्वात भीषण रेल्वे दुर्घटना आहे. 24 तासांनंतरही ढिगारे हटवण्याचे व त्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या कामी पोलिस, हवाई दल, सुरक्षा दल आणि एनडीआरएफची पथके अविश्रांत राबत आहेत. बालासोर, कटक आणि आसपासच्या शहरांतील रुग्णालयांत जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोनशेहून अधिक जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोर येथे घटनास्थळाला भेट दिली आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

भारतीय रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी ओडिशाच्या बालासोरनजीकच्या बहानग बजार येथे घडला. स्थानकावर थांबलेली मालगाडी, बंगळूर-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालीमार चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस या तीन गाड्यांचा हा अपघात घडल्याची ही घटना दुर्मीळ समजली जात आहे.

संबंधित बातम्या

असा झाला अपघात

स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीवर मागून वेगात येणारी कोरोमंडल एक्स्प्रेस धडकली आणि तिचे डबे रुळावरून घसरले. हे डबे लगतच्या रुळावर गेले. तेवढ्यात त्या रुळावरून येणार्‍या हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसची या डब्यांशी धडक झाली आणि डबे अक्षरश: हवेत उडून इतर डब्यांवर कोसळले. हा अपघात एवढा भयंकर होता की, कोरोमंडलचे इंजिन मालगाडीच्या एका डब्यावर चढले. तर उडून दोन डबे प्रवाशांनी भरलेल्या डब्यांवर कोसळले. काही डबे पूर्णपणे उलटे झाले तर मालगाडीचे आणि प्रवासी गाड्यांचे डबे एकमेकांवर कोसळले. या अपघातात एकूण 21 डबे रुळांवरून घसरले तर तीन डबे शेजारच्या रेल्वेमार्गांवर जाऊन पडले.

जखमींनी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, डब्यांच्या आसपास अनेक तुटलेले अवयव विखुरले होते. सर्वत्र रक्त-मांसाचा सडा पडला होता. जखमींच्या वेदना असह्य होऊन गुरासारखे ओरडणार्‍या लोकांच्या आवाजाने मदत व बचावकार्यात गुंतलेलेही सुन्न झाले होते. लष्कराचे प्रशिक्षित श्वान डब्यांत अडकलेल्या प्रवाशांचा शोध घेत होते.

रुग्णालयही अपुरे, शाळेत ठेवले मृतदेह

अपघाताचा भयंकर जोराचा आवाज आणि हजारो प्रवाशांच्या किंकाळ्या यामुळे लगतच्या गावातील लोक हादरले. त्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत जमेल तशी मदत सुरू केली. पोलिस, अग्निशमन दल यांची मदत अपुरी पडत असताना तातडीने एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल यांना पाचारण करण्यात आले. फक्त बालासोरच नव्हे तर कटकसह आसपासच्या शहरांतून डॉक्टर व अ‍ॅम्ब्युलन्स मागवल्या गेल्या. रात्रभर ढिगारे हटवून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. एकमेकांत अडकलेल्या व चेपलेल्या डब्यांतून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी लोखंड कापणारी साधनसामग्री मागवून पत्रे कापून लोकांना बाहेर काढण्यात आले. या बचावकार्यात स्थानिक लोकही सहभागी झाले. मृतदेहांची संख्याच एवढी प्रचंड होती की, बालासोरच्या रुग्णालयात जागा कमी पडल्याने एका शाळेत मृतदेह ठेवावे लागले. संपूर्ण रात्रभर मदत व बचावकार्य सुरू होते. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सही कमी पडत होत्या. बालासोरमधील सगळी रुग्णालये मृत आणि जखमींनी भरून गेल्याने शेकडो जखमींना लगतच्या शहरांतील रुग्णालयांत हलवण्यात आले.

रक्तदानासाठी लागल्या रांगा

जखमींना वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णालयांत दाखल केल्यावर उपचार सुरू झाले. जखमींना उपचारात रक्ताची कमतरता भासू नये म्हणून हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे आले. अनेक रुग्णालयांत रक्तदानासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या.

दोन ट्रेनमध्ये तीन हजार प्रवासी

दोन्ही प्रवासी रेल्वे गाड्यांत तीन हजारांच्या आसपास प्रवासी होते. त्यापैकी सुमारे 300 प्रवासी मरण पावले आहेत, तर एक हजाराच्या आसपास प्रवासी जखमी आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बंगळूर, हावडा, चेन्नईत हेल्पडेस्क

या अपघातानंतर बंगळूर, हावडा आणि चेन्नईत हेल्पडेस्क बनवण्यात आले असून जखमी व मृतांची माहिती त्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ओडिशा सरकारने स्थापन केलेल्या कंट्रोल रूमशी समन्वय साधून हे हेल्पडेस्क अहोरात्र काम करणार आहेत. शनिवारी मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे सर्व मदत व बचावकार्यावर लक्ष ठेवून होते. मृत आणि जखमींमध्ये बंगालच्या नागरिकांचा समावेश असल्याने प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळाची पाहणी केल्यावर त्यांनी जखमींची विचारपूस केली व किरकोळ जखमी झालेल्यांना हावडा येथे नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

आर्थिक मदतीची घोषणा

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करीत ही माहिती दिली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

रेल्वे अहवाल काय सांगतो?

रेल्वे तज्ज्ञांच्या समितीने प्राथमिक अहवाल सादर केला असून त्यात सिग्नल यंत्रणेतील घोळामुळे हा अपघात झाल्याचे म्हटले आहे. बहानग बजार स्थानकावर लूप लाईनवर मालगाडी उभी होती. त्याचवेळी कोरोमंडल एक्स्प्रेसला अप लाईनचा सिग्नल देण्याऐवजी लूप मार्गावरून जाण्याचा सिग्नल मिळाल्याने ती गाडी या लाईनवर आली. ताशी 120 कि.मी. वेगाने धडधडत कोरोमंडल एक्स्प्रेस आली आणि मालगाडीवर धडकली.

हात घट्ट धरलेली तीन चिमुकली!

वीरेश या स्थानिकाने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, एका डब्याच्या काचा फोडून आम्ही आत गेलो तर तेथे डोक्यांचा चेंदामेंदा झालेली तीन लहान मुले एकमेकांचा हात हाती घेऊन निपचित पडलेली दिसली. डॉक्टरांनी त्यांना तपासल्यावर ती तीन मुले मरण पावल्याचे समजले.

कवच प्रणाली असती, तर टळला असता अपघात!

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ओडिशातील बालासोरमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातामुळे रेल्वेची कवच प्रणाली पुन्हा चर्चेत आली आहे. ज्या मार्गावर हा अपघात झाला, तेथे ही यंत्रणा कार्यान्वित नसल्याची माहिती रेल्वे प्रवक्त्याने दिली असून ती उपलब्ध असती तर कदाचित हा अपघात टळला असता, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

एखाद्या लोको पायलटने सिग्नल तोडला, तर रेल्वेची ही स्वयंचलित सुरक्षा प्रणाली अलर्ट देण्याचे काम करते. बर्‍याचदा रेल्वे अपघातांमागे सिग्नल जंप हेच मुख्य कारण असते. एकाच मार्गावर समोरून एखादी दुसरी रेल्वे येत असेल, तर ही यंत्रणा इंटरफेस युनिटद्वारे ब्रेकचा वापर करीत रेल्वेला नियंत्रित करते.

काय आहे कवच ?

भारतीय रेल्वेने अपघात टाळण्यासाठी कवच ही स्वयंचलित सुरक्षा प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली धोकादायक स्थितीत सिग्नल ओलांडणे, वेग नियंत्रित करणे यासाठीच नव्हे; तर दाट धुके, मुसळधार पाऊस अशा खराब वातावरणातही रेल्वेचे संचालन सुरू राहण्यासाठी महत्त्वाची ठरते. एकंदरीत सुरक्षित रेल्वे प्रवास सुनिश्चित करणारी ही प्रणाली रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्डस् ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ) विकसित केली आहे. याची पहिली चाचणी 2016 मध्ये झाली होती.

या यंत्रणेची चाचणी दक्षिण मध्य रेल्वेच्या लिंगमपल्ली-विकाराबाद-वाडी आणि विकाराबाद-बिदर सेक्शन या अडीचशे किमीच्या ट्रॅकवर करण्यात आली आहे. ती यंत्रणा बसवण्यासाठी तीन एजन्सीजची नियुक्ती केली आहे.

कवचवर 16.88 कोटी खर्च करण्यात आला असून नवी दिल्ली-हावडा, नवी दिल्ली-मुंबई मार्गावर ही प्रणाली मार्च 2024 पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.

Back to top button