पेट्रोल-डिझेल दरात कोणतीही कपात केली जाणार नाही : हरदीपसिंह पुरी | पुढारी

पेट्रोल-डिझेल दरात कोणतीही कपात केली जाणार नाही : हरदीपसिंह पुरी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. वाढत्या दरामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल चे दर कधी कमी होणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र या इंधनांच्या किमतीमध्ये कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी दिले आहेत. दरम्यान, रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर 35 पैशांनी वाढले.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ होत असल्याने दर कपातीबाबत निर्णय होऊ शकतो, असे सरकारी सूत्रांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र पेट्रोलियम मंत्री पुरी यांनी ही शक्यता फेटाळून लावली.

मुंबईत पेट्रोलचा प्रतिलिटर दर 111.77 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर एक लिटर डिझेलसाठी 102.52 रुपये मोजावे लागत आहेत, तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलिटर दर 115.73 रुपये इतका आहे.

13 दिवसांत भरमसाट दरवाढ

ऑक्टोबर महिन्यात 13 वेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या काळात पेट्रोल 3.85 रुपयांनी, तर डिझेल प्रतिलिटरमागे 4.35 रुपयांनी महाग झालेे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 90 डॉलर्स प्रतिबॅरल इतके होण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या एनव्हायएमई क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे, तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स आहे.

कोरोना येण्यापूर्वीच्या तुलनेत सध्या पेट्रोल 10 ते 15 टक्के आणि डिझेलचा वापर 6 ते 10 टक्के वाढला आहे. मी किमतीवर जाणार नाही. आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
-हरदीपसिंह पुरी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री

Back to top button