Indian Economy : जागतिक अर्थकारणाला भारत गती देणार | पुढारी

Indian Economy : जागतिक अर्थकारणाला भारत गती देणार

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीच्या द़ृष्टीने दिलासादायक असून आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थकारणाला गती देण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नोंदविले आहे.

नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक पाहणी अहवाल (वर्ल्ड इकॉनॉमी आऊटलूक रिपोर्ट) नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यात 2023 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 5.9 टक्क्यांच्या गतीने वाढेल, असे निरीक्षण नोंदविण्यात आले असून भारताच्या या उल्लेखनीय प्रगतीला देशाने अवलंबिलेले डिजिटलायजेशन कारणीभूत ठरले आहे. तसेच कोरोनानंतर गती खुंटलेल्या भारताला तत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकारची धोरणेही उपयुक्त ठरल्याचे या अहवालात नमूद केले आहे. Indian Economy

नाणेनिधीच्या या अहवालानुसार सध्याच्या जगाच्या अर्थव्यवस्थेची गती 2.8 टक्क्यांवर आहे. 2024 मध्ये ही गती 3 टक्क्यांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. नाणेनिधीच्या कार्यकारी संचालक क्रिस्टलिना जॉर्जिवा यांच्या म्हणण्यानुसार, भारत हा गेले काही महिने जागतिक अर्थव्यवस्थेच्या नकाशावर एक तेजस्वी किरण बनून राहिला आहे आणि जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या वृद्धीत भारताचा 15 टक्के इतका हिस्सा आहे. भारताने आपल्या विकासाचा दर मार्च 2023 अखेर 7.8 टक्क्यांवर राखून ठेवला तर चालू आर्थिक वर्षात हा विकास दर 6.1टक्क्यांवर राहील, असा अंदाज आहे.

नाणेनिधीमार्फत जागतिक आर्थिक पाहणी आहवाल तयार करताना एक विशिष्ट प्रारूप (मॉडेल) वापरले जाते. यामध्ये जगातील 8 मोठ्या अर्थव्यवस्थांचा (Indian Economy) समावेश आहे. अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, चीन, इंडिया आणि ब—ाझिल या देशातील भौगोलिक विकास, उत्पादकतेचा कल, निवृत्तीचे वय आणि अन्य परिमाणांचा विचार करून हा हवाल तयार करण्यात येतो. या 8 देशांत 5 विकसित अर्थव्यवस्था आणि 3 सर्वात मोठ्या उभरत्या बाजारपेठा व विकसनशील अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. या 8 देशांचे एकत्रित सकल राष्ट्रीय उत्पन्न जगातील एकूण सकल जागतिक उत्पन्नाच्या 70 टक्क्यांवर आहे. नाणेनिधीच्या या अहवालाने भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासावर शिक्कामोर्तब तर केले आहेच. शिवाय भारत आता जर्मनीला मागे टाकून पुढे जाण्याची तयारी करीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Indian Economy : पाकिस्तान संकटात!

1947 साली भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकाचवेळी जगाच्या नकाशावर आले. गेल्या 75 वर्षांत भारताने जगातील अर्थव्यवस्थांच्या पंक्तीमध्ये ब्रिटनला मागे टाकून पाचवे स्थान पटकावले आहे. याउलट पाकिस्तानात मात्र अर्थ व्यवस्थेची अवस्था दयनीय आहे. पाकिस्तानात महागाईने 36.4 टक्क्यांवर विक्रमी झेप घेतली आहे. 1964 नंतर प्रथमच पाकिस्तान एवढ्या मोठ्या महागाईला तोंड देतो आहे. पाकिस्तानात महागाईचा दर दक्षिण आशियामध्ये सर्वाधिक तर आहेच पण ग्रामीण भागात हा दर 40.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. दळणवळणाच्या किमती 56.8 टक्क्यांनी तर अन्नधान्यातील महागाई 48.1 टक्क्यांनी वाढली आहे.

हे ही वाचा :

Indian Economy : विकासाचे चक्र गतिमान; बेरोजगारीचा दर घटला!

Indian Economy : २०२७ पर्यंत भारत बनणार जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

Back to top button