Indian Economy : विकासाचे चक्र गतिमान; बेरोजगारीचा दर घटला!

file photo
file photo

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अर्थव्यवस्थेला Indian Economy चांगले दिवस येतील, असा विश्वास देशाला देत यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात 2023-24 मध्ये देशाचा जीडीपी दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज केंद्र सरकारकडून मंगळवारी व्यक्त करण्यात आला. कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरून आता झेप घेत आहे. बेरोजगारीचा दरही 8.3 टक्क्यांवरून घटला असून, तो आता 7.2 टक्क्यांवर आल्याने देशाला दिलासा मिळाला आहे. तसेच यंदा खनिज तेलाच्या किमती कमी राहतील, त्यामुळे भारताची तेल खात्यातील तूट सध्याच्या अंदाजापेक्षा कमी राहील, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात जागतिक मंदीमुळे निर्यातीचा वेग मंदावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यंदा अर्थव्यवस्थेचा अपेक्षित वृद्धी दर गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर 8.7 टक्के नोंदवला गेला होता.

Indian Economy विकास दरवाढ यंदा कमी राहणार असली, तरी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढेल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. देशात मुबलक प्रमाणात परकीय चलन गंगाजळी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची घसरण झाली, तरी ती सावरण्यासाठी हस्तक्षेप करता येईल. पुरेशा परकीय चलनाच्या साठ्यामुळे चालू खात्यातील तूट नियंत्रणात आणता येऊ शकते, असा आशावाद आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतातील परकीय चलन गंगाजळीची स्थिती मजबूत आहे. दरम्यान, किरकोळ महागाई निर्देशांक अजूनही आरबीआयच्या आवाक्याबाहेर असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

Indian Economy अहवालात नमूद केले आहे की, रोजगार व नोकर्‍यांचे प्रमाण कोरोनापूर्व काळाच्या पातळीला येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागांत बेरोजगारीचे प्रमाण घटत आहे. रोजगार मागणी व पुरवठा यांच्या तपशिलानुसार, कोरोनापूर्व काळाची स्थिती येत असल्याचे चित्र आहे. जुलै ते सप्टेंबर 2019 या तिमाहीत बेरोजगारीचा दर 8.3 होता तो जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाहीत 7.2 टक्के झाला आहे. याचाच अर्थ रोजगार व नोकर्‍या उपलब्ध होण्याचे प्रमाण शहरी व ग्रामीण भागांत वाढत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नोंदींमध्येही वाढ दिसू लागली असून, हे रोजगार वाढल्याचे निदर्शक मानले जाते. एप्रिल ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत 'ईपीएफओ'कडील नवीन खात्यांची दरमहा सरासरी संख्या 8 लाख 80 हजार होती, ती एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 13 लाख 20 हजार झाली. उत्पादन क्षेत्रात रोजगारांचे प्रमाण वाढत असून, 100 पेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्यांतही वाढ होताना दिसत आहे.

यंदा खनिज तेलाच्या किमती कमी राहतील आणि त्यामुळे भारताची तेल खात्यावरील तूट सध्याच्या अंदाजापेक्षा कमी असेल. एकुणात, बाह्य परिस्थिती आटोपशीर राहील, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

Indian Economy : लवचिकतेमुळे गती कायम

जागतिक विकास दराचा मंदावलेला वेग, संकुचित जागतिक व्यापारामुळे चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत निर्यातीत घट झाली आहे. दरम्यान, पीएम किसान, पीएम गरीब कल्याण योजना यासारख्या योजनांमुळे गरिबी कमी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. कर्ज वितरण, भांडवली गुंतवणूक चक्र, सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्मचा विस्तार तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उत्पादन आधारित सवलती योजना, राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण व पीएम गती शक्ती यासारख्या योजनांना सरकारने प्राधान्य दिलेले आहे. आर्थिक लवचिकतेमुळे विकासाची गती कायम राखली गेली आहे. विशेषतः, रशिया-युक्रेन युद्ध असूनही अर्थव्यवस्था स्थिर राहिलेली आहे. लहान व्यावसायिकांकडून जमा केल्या जाणार्‍या जीएसटीमध्ये वाढ झाली आहे, असेही आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Indian Economy : व्याज दरवाढीचे संकेत

भारताचा विकास आगामी 2023-24 या आर्थिक वर्षात 6.5 टक्के बेसलाईन दराने आणि 6 ते 6.8 टक्क्यांच्या श्रेणीत होण्याचा अंदाज आहे. यामध्ये जागतिक आर्थिक मंदी हा प्रमुख जोखमीचा घटक आहे. कोरोनामुळे आकुंचन पावलेली आपली अर्थव्यवस्था आता हळूहळू सावरू लागली आहे. त्याचबरोबर रशिया व युक्रेन यांच्यातील युद्ध आणि महागाई यांच्या प्रभावातून अर्थव्यवस्था बाहेर येऊ लागली आहे, असे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी आपल्या पाहणीत म्हटले आहे. नागेश्वरन यांच्या अधिपत्याखाली झालेले हे पहिलेच आर्थिक सर्वेक्षण आहे. कोरोना साथीतून भारताचे पुनरुत्थान तुलनेने जलद झाले. देशांतर्गत पातळीवर ठोस मागणी आणि भांडवली गुंतवणुकीत वाढ, यामुळे आगामी वर्षातील वाढीला मोठी चालना मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने खासगी क्षेत्रातील नवीन भांडवलनिर्मितीचे चक्र गतिमान राहील, अशी चिन्हे आहेत.

मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात अनेक मुद्द्यांबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त झाले असले, तरी एकंदर व्यापार मंद राहील, असेही नमूद करण्यात आले आहे. अनिश्चित वातावरणामुळे आर्थिक उत्पादनातील वाढ मंद राहील व त्यामुळे व्यापारातील वाढ कमी होईल. जागतिक व्यापारातील वाढ कमी असेल, असे जागतिक व्यापार संघटनेच्या अहवालामध्येही नमूद करण्यात आल्याचा हवाला आजच्या सर्वेक्षणात देण्यात आला. जागतिक व्यापारातील वाढ 2022 मध्ये 3.5 टक्के होती, ती 2023 मध्ये 1.0 टक्क्यांपर्यंत येऊ शकेल, असे सर्वेक्षणात नमूद आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news