विरोधकांना केवळ सत्ता हवी आहे, तर आमचे लक्ष्य देशाच्या पुढील २५ वर्षांच्या विकासावर; पंतप्रधान मोदी | पुढारी

विरोधकांना केवळ सत्ता हवी आहे, तर आमचे लक्ष्य देशाच्या पुढील २५ वर्षांच्या विकासावर; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विरोधकांना केवळ सत्ता हवी आहे, तर आमचे लक्ष्य देशाच्या पुढील २५ वर्षांच्या विकासावर आहे, असे सांगतानाच कर्नाटकच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताने सत्ता प्राप्त करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कर्नाटक भाजपच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना व्यक्त केला.

कार्यकर्तेच विजयात महत्त्‍वाची भूमिका बजावतात, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये मिसळून त्यांना छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांनी मोठी भाषणे करण्याची गरज नाही, तर सरकारने केलेली चांगल्या कामांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे व भाजप सरकारमुळे विकासाला कशी गती आली आहे, त्याची माहिती देणे गरजेचे आहे. कर्नाटकात प्रचारासाठी जात असलेल्या नेत्यांवर कर्नाटकचे लोक स्नेहाचा वर्षाव करीत आहेत, असा उल्लेखही मोदी यांनी केला.

भाजपचा एक अनुशासित कार्यकर्ता म्हणून लवकरच आपण कर्नाटकात प्रचारासाठी येत आहे, असे मोदी म्हणाले. मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर टीकाही केली. काँग्रेसच्या काळात विकासाऐवजी भ्रष्टाचाराचा बोलबाला होता. काँग्रेसने आपल्या ७० वर्षांच्या सत्ताकाळात जेवढी एम्स रुग्णालये बनविली, तितकी आम्ही केवळ १० वर्षांत बनविली, असे मोदी यांनी नमूद केले. दहा दिवसांच्या आत आपला बूथ जिंकण्याबरोबरच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कसा काय विजय प्राप्त करता येईल, असा प्रश्न एका कार्यकर्त्याने विचारला असता ‘तुमच्यासारखा २० कार्यकर्त्यांचा समूह त्यासाठी लोकांमध्ये जावा लागेल, असा मंत्र मोदी यांनी दिला.

हेही वाचा :

 

Back to top button