अनिल अंबानींच्या Reliance Capital ची मालकी हिंदुजा ग्रुपकडे?, ९,६५० कोटींची लावली सर्वोच्च बोली | पुढारी

अनिल अंबानींच्या Reliance Capital ची मालकी हिंदुजा ग्रुपकडे?, ९,६५० कोटींची लावली सर्वोच्च बोली

पुढारी ऑनलाईन : अनिल अंबानी यांच्या कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटलच्या (Reliance Capital) विक्रीसाठी आयोजित केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील लिलावात हिंदुजा ग्रुपच्या एका कंपनीने तब्बल ९,६५० कोटींची सर्वात मोठी बोली लावली. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (IndusInd International Holdings) असे हिंदुजा ग्रुपच्या कंपनीचे नाव आहे. हिंदुजा ग्रुपने पहिल्या फेरीत ७,५१० कोटी रुपयांची ऑफर दिली होती जी दुसऱ्या) फेरीत ९,६५० कोटी रुपयांवर नेली. या पार्श्वभूमीवर रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे ३ टक्क्यांनी वाढले. हा शेअर २.८२ टक्क्यांनी वाढून बीएसईवर ९.१० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला.

पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ऑनलाईन लिलावाच्या दुसऱ्या फेरीत इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेडने ९,६५० कोटींची सर्वात मोठी बोली लावली. कोणतीही काउंटर ऑफर नसल्याने ही लिलाव प्रक्रिया संपली. हिंदुजा ग्रुपची ऑफर ही टॉरेंट इन्व्हेस्टमेंटने डिसेंबरमध्ये पहिल्या फेरीच्या लिलावादरम्यान ऑफर केलेल्या पेक्षा १ हजार कोटींनी अधिक आहे. बुधवारी झालेल्या लिलावात इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स ही रिलायन्स कॅपिटलसाठी (Reliance Capital) एकमेव बोलीदार कंपनी होती.

दरम्यान, टोरेंट इन्व्हेस्टमेंट आणि सिंगापूरची ऑक्ट्री कॅपिटल यांनी यापूर्वी दुसऱ्या टप्प्यातील लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचे संकेत दिले होते. पण त्यांनी दुसऱ्या टप्प्यात कोणतीही बोली सादर केली नाही. रिलायन्स कॅपिटलच्या कमिटी ऑफ क्रेटिटर्सने दुसऱ्या टप्प्यातील लिलावात १० हजार कोटींची बेस प्राइस निश्चित केली होती. तर पहिल्या टप्प्यातील लिलावात कमीत कमी ९,५०० कोटी रुपये बेस प्राइस ठेवली होती. डिसेंबरमध्ये झालेल्या पहिल्या लिलावात टोरेंट इन्व्हेस्टमेंटने सर्वाधिक ८,६४० कोटी रुपयांची ऑफर दिली. त्यानंतर हिंदुजा ग्रुपने ८,११० कोटी रुपयांची ऑफर दिली. त्यानंतर २४ तासांच्या आत हिंदुजा ग्रुपने ९ हजार कोटींची सुधारित बोली ऑफर केली, ज्याला टोरेंट कंपनीने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) समोर आव्हान दिले होते.

हे ही वाचा :

Back to top button