पुणे / वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांची पोर्शे कार चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात एका दुचाकीला धडक दिल्याने आयटी इंजिनिअर तरुण, तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कल्याणीनगर येथील लँडमार्क सोसायटीजवळ घडला. दरम्यान, मुलाला अटीशर्तीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अनिस अवलिय आणि अश्विनी कोस्ता (दोघे रा जबलपूर, मध्यप्रदेश) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. याप्रकरणी एकीब रमजान मुल्ला यांनी येरवडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. बांधकाम व्यावसायीक विशाल अगरवाल ( रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी, पुणे) यांची कार चालवत असलेल्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायीक आणि अल्पवयीन मुलाला मद्य पुरविणार्या करणार्या पबच्या व्यवस्थापकारवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा हा बांधकाम व्यावसायीक विशाल अगरवाल यांच्या नावावर असलेली कार भरधाव चालवत होता. अश्विनी आणि अनिस हे दोघेही त्यांच्या पल्सर दुचाकीवरून कल्याणीनगरकडून येरवड्याकडे मित्रांसह जात होते, त्या वेळी अल्पवयीन आरोपी चालवत असलेल्या पोर्शे कारचे नियंत्रण सुटल्याने या कारने दुचाकी आणि इतर वाहनांना धडक दिली. यामध्येच तरुण-तरुण हवेत उडून जमीनीवर आदळले गेले. गंभीर जमखी झाल्यामुळ अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिसला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
रात्री अडीचच्या सुमारास भरधाव वेगात धडक देत असताना एक कार वाहनचालकांना दिसली. त्यानंतर एकच आवज झाला. यानंतर नागरिकांना दुचाकीवरील तरुण-तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.. तरुण गंभीर जखमी झाल्याने तडफडत होता, तर तरुणी निपचीत पडली होती. तिचा जागीच मृत्यू झाला होता, तर अल्पवयीन आरोपी चालवत असलेल्या पोर्शे गाडीतील चारही एअरबॅग फुटल्या होत्या. नागरिकांनी धावत घटनास्थळावर धाव घेतली. या वेळी अल्पवयीन मुलाचे निरीक्षण केल्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे त्यांना आढळून आले. तसेच, त्याच्या गाडीत अन्य तीन जण असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी कार चालविणार्या मुलाला बाहेर ओढले. अपघाताचा सर्व राग नागरिकांनी त्याच्यावर काढत त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला नागरिकांनी पोलिसांच्या हवाली केले.
हेही वाचा