राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी दिल्या ईदच्या शुभेच्छा | पुढारी

राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी दिल्या ईदच्या शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात आज ईद उत्साहात साजरी केली जात आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती भवनाने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईद हा पवित्र रमजान महिन्याचा शेवट आहे. ईद हा प्रेम आणि करुणेच्या भावना सामायिक करण्याचा सण आहे. हा सण आपल्याला एकोप्याचा आणि परस्पर सामंजस्याचा संदेश देतो.

राष्ट्रपती मुर्मू यांनी ईदच्या पूर्वसंध्येला नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सर्वांना बंधुभाव वाढविण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यास सांगितले आहे. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, “ईद हा आपल्याला शांततापूर्ण आणि समृद्ध समाज निर्माण करण्याची प्रेरणा देतो. ईदच्या निमित्ताने भारतातील आणि परदेशातील सर्व नागरिकांना, आपल्या मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना मनापासून शुभेच्छा.”

पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी जगभरातील लोकांना शांती, आरोग्य आणि आनंदाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान म्हणाले की, “भारतीय जनतेच्या वतीने मी तुम्हाला आणि बांगलादेशच्या लोकांना ईदच्या शुभेच्छा देतो. रमजानमध्ये जगभरातील मुस्लिम उपवास करतात आणि प्रार्थना करतात. ईदच्या शुभमुहूर्तावर जगभरातील लोकांना एकतेच्या मूल्यांची जाणीव होत आहे.”

राहुल गांधीनीही दिल्या शुभेच्छा

राहुल गांधींनी ट्विट करून देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, सर्वांना ईद मुबारक! हा मंगल सण सर्वांना शांती, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो.

Back to top button