भारताने विकसित केलेले लष्करी तंत्रज्ञान आफ्रिकन देशांना द्यायला तयार : राजनाथ सिंह | पुढारी

भारताने विकसित केलेले लष्करी तंत्रज्ञान आफ्रिकन देशांना द्यायला तयार : राजनाथ सिंह

पुणे, पुढारी वृत्तसेवा: भाषेमध्ये फरक असला, तरी आपण एकच आहोत. शांततेत जगण्याचा अधिकार आहे. भारत आफ्रिकेचे जुने संबंध लक्षात घेता आम्ही भारतात विकसित केलेले लष्करी तंत्रज्ञान आफ्रिकन देशांना द्यायला तयार आहोत, असे मत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले.

पुणे औंध येथील परदेशी प्रशिक्षण विभागात सुरू असलेल्या भारत- आफ्रिका सैनिक प्रशिक्षण सरावात अनेक देशांचे सैनिक सहभागी झाले आहेत. मंगळवार २८ मार्च रोजी दुपारी सरावाच्या पाहणीनंतर झालेल्या बैठकीत राजनाथसिंह बोलत होते. भारत – आफ्रिका शिखर परिषदेनंतर आफ्रिकेशी अधिकाधिक संपर्क कायम राखण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा संयुक्त सराव होत आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून भुसुरूंग विरोधी कारवाई करणे आणि शांतता प्रस्थापित करणे यासंबंधी प्रशिक्षण या सरावात दिले जात आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भारत आफ्रिका संबंध चांगले असून भारताची संस्कृती जुनी आहे. आता भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने पुढे जात आहे. आफ्रिकेतील देशांची लोकसंख्या देखील वेगाने वाढत आहे. 2050 पर्यंत भारत व आफ्रिका देशात युवकांची जास्त संख्या म्हणून उदयास येऊ शकतात. आफ्रिकन देशांनी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर अतिशय वेगाने विकसित केला असून त्यांचे पेसा नावाचे मोबाईल बँकिंग ॲप चांगले आहे. स्वातंत्र्यानंतर मैत्रीपूर्ण संबंध आणखी वेगाने वाढत आहे. तेथील आर्थिक प्रगती, रोजगार आणि सामाजिक स्वास्थ राखण्यासाठी एकत्र येऊन उभे राहण्याची गरज असल्यावरही त्यांनी भर दिला. एकविसाव्या शतकातील विविध प्रकारची आव्हाने पेलण्यासाठी अशा प्रकारच्या सरावाची गरज आहे. हे करत असताना भविष्यात आपतकालीन व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा पुरविण्याची जबाबदारी देखील लष्करावर येत आहे. त्यामुळे वेळेचे महत्त्व ओळखून तत्पर राहण्याची गरज असल्याचेही सिंह यांनी सांगितले.

भारत हा जगातील सर्वात मोठा संरक्षण यंत्र पुरवणारा देश म्हणून नावारुपास आला आहे. भारताचे हे तंत्रज्ञान आफ्रिकन देशांना देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला आहे.

 

Back to top button