पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता | पुढारी

पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा भरून निघाला की पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी होतील, अशी दिलासादायक माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली आहे; तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही तेलाच्या किमती कमी होण्याचे संकेत दिले आहेत.

शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले की, गेल्या वर्षी युक्रेन युद्धामुळे जगभरात तेलाच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना चांगलाच तोटा सहन करावा लागला. पण इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी मालकीच्या कंपन्यांनी गेल्या 15 महिन्यांत इंधनाचे दर बदललेले नाहीत, हेही सत्य आहे. कंपन्या आपला तोटा भरून निघाल्या की नक्कीच इंधनाचे दर कमी होतील, अशी आपल्याला आशा असल्याचे पुरी म्हणाले.

पेट्रोलियम कंपन्यांच्या तोट्याबद्दल बोलताना पुरी म्हणाले की, कंपन्यांचा पेट्रोलमधील नफा 10 रु. होता. त्यात कंपन्यांनी निम्म्याने घट केल्याने तोटा वाढला आहे. तेल कंपन्या या जबाबदार कंपन्यांप्रमाणे वागत असून नागरिकांना तेलातील जागतिक महागाईचा फटका बसू नये यासाठी त्यांनी दरवाढ केलेली नाही. सरकारने त्यांना दरवाढ करू नका असे सांगितलेले नाही. तो निर्णय कंपन्यांनीच घेतल्याचेही ते म्हणाले.

कच्च्या तेलाच्या खरेदीचे मूल्य जास्त असताना पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर ठेवल्याने तिन्ही कंपन्यांना तोटा झाला आहे. तिन्ही कंपन्यांना एप्रिल ते सप्टेंबर 2022 या काळात 21 हजार 201 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचेही पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले.

महागाई कमी होण्यास हातभार लागेल : गव्हर्नर शक्तिकांत दास

तेल कंपन्यांचा तोटा कमी झाल्यावर इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता पेट्रोलियम मंत्री व्यक्त करीत असतानाच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही दरवाढ कमी करण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती सहा महिन्यांपूर्वी होती, त्यापेक्षा आता अधिक चांगली झाली आहे. आम्ही कच्च्या तेलाचा दर आगामी काळात 95 डॉलर्स प्रतिबॅरल गृहित धरून अंदाज बांधलेले आहेत. त्यामुळे जर तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली तर त्याचा इतर वस्तूंच्या किमतीवरही परिणाम होईल आणि महागाई कमी होण्यास हातभार लागेल. ’

Back to top button