सादिक रडतोय ढसाढसा… आईच्या खुनाचा पश्चात्ताप! | पुढारी

सादिक रडतोय ढसाढसा... आईच्या खुनाचा पश्चात्ताप!

दिलीप भिसे

कोल्हापूर : क्षणिक रागापोटी एखाद्याच्या हातून कोणते आक्रीत घडेल, याचा नेम नसतो… घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर होणारा पश्चात्ताप वेदनादायी ठरतो… मग पश्चात्तापातून आक्रोश अन् ढसा ढसा रडण्याशिवाय पर्याय नसतो… मनाचा थरपाक उडविणारी अशीच घटना नुकतीच कोल्हापुरात साळोखे पार्कात घडली. पती-पत्नी यांच्यातील क्षुल्लक वादातून स्वत:च्या मुलाने आईचा अमानुष खून केला… खुनी सादिक भानावर आला… पश्चात्तापाने त्याचा आता आक्रोश सुरू आहे. पोलिस ठाण्यात लॉकअपमध्ये तो ढसाढसा रडतोय…

पहिल्या पत्नीने घटस्फोट घेतला. दोन वर्षांपूर्वी त्याने सांगलीतील युवतीशी संसार थाटला… दाम्पत्याला एक मुलगाही झाला. टेंपोचालक सादिक मुजावर (वय 35) याला कालांतराने दारूचे व्यसन जडले… त्यात त्याचा रागीट स्वभाव… दारूची नशा चढली की, डोक्यात रागाचा पारा चढायचा… कुटुंबीयांतील काही सदस्यांसह नातेवाइकही त्याच्यापासून चार हात दूरच होते.

सादिकने पै-पाहुण्यानाही गाठले!

काही दिवसांपूर्वी त्याची सांगलीतील पत्नीही छळाला कंटाळून माहेरी गेली होती. आई शहनाज मुजावर (वय 60) यांनी, पत्नीची समजूत काढून तिला परत घराकडे आणावे, यासाठी तगादा सुरू केला होता. मुलाच्या तापट स्वभावामुळे काही दिवस जाऊ दे… मुलगा भानावर आला की सुनेला घरी आणू, अशी शहनाज यांची मानसिकता बनली होती.

पत्नी आजच परतली पाहिजे…

आजच पत्नी घरी आली पाहिजे, हा त्याचा ठेका… मंगळवारी सायंकाळी तो घरी आला… रात्री साडेआठला त्याने पत्नीला फोन केला. चार-पाच मिनिटे त्यांच्यात संवाद घडल्यानंतर सादिक पत्नीशी मोठ्या आवाजात बोलू लागला. मोबाईलवर शिवीगाळ करू लागला. तुला सोडत नाही… ठेवणार नाही… बघून घेतो… कुटुंबीयांना हिसका दाखवितो, असे जोरजोरात बडबडू लागला.

पत्नीने मोबाईल बंद केला, सादिक भडकला!

मोबाईलवर त्याचा वाद सुरू असतानाच आई शहनाज घरातच होत्या. सादिकने दोन- तीनवेळा मोबाईलवरून पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिने दाद दिली नाही. संतापलेल्या सादिकने मग आई शहनाज यांना शिवीगाळ सुरू केली. शहनाज शांतच राहिल्या…

निष्पाप मातेच्या छातीवर चाकूचा वार

आई बोलत नाही, म्हटल्यावर त्याचा राग अनावर झाला. आईच्या अंगावर तो धावून गेला…पत्नीला आणणार आहेस की नाही, असा त्याने सवाल केला. त्यावर आईने त्याला तुझ्या रागावर कंट्रोल ठेव… रागात पत्नीचा जीव घेशील… तुझ्यात सुधारणा झाल्याशिवाय पत्नी येणार नाही, असे ठणकावताच तो भडकला. स्वयंपाक खोलीतील धारदार चाकू घेतला अन् आईच्या छातीवर पहिला आरपार वार केला… शहनाज यांनी जीवाच्या आकांताने शेजारी राहणार्‍या नातेवाइकांच्या घरी आश्रयाला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सादिकने पाठलाग करून दुसरा वार केला.

क्षुल्लक कारणातून आईचा बळी

जीव वाचविण्यासाठी त्या तडफडू लागल्या. अति रक्तस्राव होऊन त्यांची प्राणज्योत मालवली… स्वत:च्या मुलानेच कौटुंबिक आणि क्षुल्लक कारणातून कष्टाने संसार फुलविलेल्या वृद्ध, निष्पाप आईचा खून केल्याने साळोखे पार्कासह राजारामपुरीचा परिसर दोन दिवसांपासून हळहळतोय…

आईच्या खुनाचा होतोय पश्चात्ताप

संतप्त जमावाने त्याची धुलाई करून पोलिसाच्या हवाली केले. सादिक भानावर आला असून, त्याने खुनाची कबुलीही दिली आहे. खुनासाठी वापरलेला चाकूही पोलिसांकडे सोपविला आहे. पोलिसांच्या चौकशीत तो दोन्ही गुडघ्याच्यामध्ये डोके घालून बसला आहे. आईच्या खुनाचा त्याला पश्चात्ताप होतोय…

आक्रोश अन् ढसाढसा रडतोय…

राजारामपुरी पोलिस ठाण्याचे तपासाधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक भारत साळुंखे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. क्षुल्लक कारणातून मुलाने निष्पाप आईच्या केलेल्या खुनामुळे पोलिस यंत्रणाही चक्रावली आहे. संशयिताला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी बजाविली आहे.

Back to top button