Gajendra Yadav : निसर्गाशी बांधली 'लगीनगाठ', तब्बल ८ लाख झाडांचा झाला 'बाप' !

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येकाच्या प्रेमाची व्याख्या वेगळी. ते व्यक्त करण्याची पद्धतही वेगळी असते; पण त्याचं निर्सगावरील प्रेम हे शब्दातीत आहे. या प्रेमापोटीच त्याने चक्क अविवाहित राहण्याची ‘भीष्म प्रतिज्ञा’ केली. अविवाहीत राहून त्याने आजवरचं आपलं जगणं निसर्गाला समर्पित केलं आहे. अशा या पश्चिम चंपारण्यामधील (बिहार) अविलियाचे नाव आहे गजेंद्र यादव. (Gajendra Yadav) ४० वर्षीय गजेंद्र यांनी निसर्ग प्रेमापोटी आतापर्यंत तब्बल आठ लाख झाडं लावली आहेत. ही झाडंच माझी मुलं आहेत, असे ते म्हणतात. जाणून घेवूया ८ लाख झाडांच्या बाप असणार्या माणसाची गोष्ट.
गजेंद्र यादव यांनी निसर्गाची जोपासणा करता यावी म्हणून अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे ते पूर्ण वेळ झाडं लावणे आणि लावलेली झो जगवणे यासाठी देवू शकले. गजेंद्र हे बगहा भागामधील पिपरा गावातील रहिवासी आहेत.
Gajendra Yadav : मी या झाडांना माझी मुलं मानतो
गजेंद्र हे त्यांच्या चार भावंडापैकी सर्वात मोठे. त्यांच्या इतर भावंडांची लग्न झाली आहेत. आपल्या छंदाविषयी ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना ते म्हणाले की,” लग्न करण्यासाठी कुटुंबीयांनी माझ्यावर खूप दबाव आणला होता; पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. मी लग्नाची निवड केली असती तर पत्नी आणि मुलांच्या सहवासाचा आनंद घेणारा समाजातील एक माणूस असतो. मला पर्यावरण संवर्धनाकडे पूर्णपणे लक्ष देता आले नसते. आता मी सकाळी उठल्यानंतर झाडांचीच सेवा करतो. मी या झाडांना माझी मुलंच मानतो. आपल्या कुटुंबातील सदस्य मानताे आणि त्यांच्या सहवासात सर्व सणही साजरे करतो.”
मी या झाडांना माझी मुलं मानतो-गजेंद्र यादव
जीवन निसर्गाला समर्पित
गजेंद्र यादव यांनी झाडे लावत, त्यांचे संरक्षण करत समाजात निसर्गाबदद्ल जागरुकता निर्माण केली आहे. एक आदर्श निर्माण केला आहे. यावर बोलताना वरिष्ठ आयपीएस अधिकारी विकास वैभव म्हणाले, “गजेंद्र यादव यांच्या पुढाकाराने पर्यावरण संवर्धनाबद्दल समाजात मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. त्यांनी वृक्षारोपणाची काळजी घेण्यासाठी विवाह केला नाही. त्यांनी आपले जीवन पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित केले आहे.”

Gajendra Yadav : 8 लाख रोपे लावली
गजेंद्र यादव यांच्या पर्यावरण संवर्धन कार्याचा समाजासह सरकारनेही दाद घेतली आहे. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. बिहार राज्याच्या पर्यावरण आणि वन विभागाने त्यांचा गौरव केला आहे. २००३ मध्ये पर्यावरण संवर्धनाच्या कामात सहभागी झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत सुमारे ८ लाख रोपे लावली आहेत. त्यांनी लावलेल्या झाडांमध्ये बरगड (वटवृक्ष), पिंपळ, पाकड आणि कडुलिंब यांचा समावेश आहे. त्यांच्या मते, “ही झाडं केवळ सावलीच देत नाहीत तर अन्न आणि निवारा देखील देतात. अशी झाडे केवळ पक्ष्यांनाच आसरा देत नाहीत तर पुराच्या वेळी मातीची धूप देखील रोखतात. ही झाडे दीर्घायुष्य आणि मानवाला पुरेसा ऑक्सिजन देतात. त्यांनी गावाबाहेरील नदीचे बंधारे, कालवे, रस्ते आणि शाळेच्या आवारातील मोकळ्या जागेत वृक्षारोपन केले आहे.”

सुदैवाने मी जगलो ….
यादव यांची निसर्गप्रती असणार्या समर्पणाची गोष्टही भन्नाट आहे. ते सांगतात,”मी हृदयाच्या गंभीर समस्यांमुळे दोन वर्षे अंथरुणाला खिळून होतो. माझ्या आयुष्यात आनंद पूर्णपणे गायब झाला होता. एकप्रकारचा एकसुरीपणा आला होता. मी रेडिओवर वेगवेगळे कार्यक्रम ऐकायला सुरुवात केली. तेव्हा मला आपल्या जगण्यात वनस्पतीचे असणारे महत्त्व कळले. तेव्हा मी ठरवलं, जर मी जगलो तर पर्यावरण वाचवण्याचे व्रत घेईन. आणि मी सुदैवाने जगलो आणि मी वृक्षारोपणाकडे वळलो.

Gajendra Yadav : १०० तरुणांची टीम
गजेंद्र यादव यांनी परिसरातील झाडे तोडली जावू नयेत, यासाठी लक्ष ठेवण्यासाठी १०० तरुणांची टीम तयार केली आहे. ही तरुण झाड तोडणाऱ्यांवर लक्ष ठेवतात. त्यांना झाड तोडण्यापासून परावृत करतात. झाडं तोडताना पकडल्यानंतर ज्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यांना सोपडण्यात आले. परंतू, वारंवार समज देवूनही झाडे तोडणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मी लाकूडतोड करणाऱ्यांविरुद्ध 30-35 तक्रारी दिल्या. संबंधितांवर गुन्हेही दाखल झाले. पण त्यांनी माफी मागितल्यानंतर अनेकांना माफही केले आहे. तुरुंगात गेल्यानंतर वृक्ष तोड करणारे गुन्हेगार बनू नये असे मला वाटते,” असेही गजेंद्र यादव म्हणाले.

हेही वाचा
- Biodiversity : पर्यावरण : जैवविविधतेच्या रक्षणासाठी…
- पर्यावरण : आव्हान ई-कचर्याचे
- Green Bond : पर्यावरण रक्षणासाठी पैशाचं ‘झाड’
- परभणीच्या 11 तरुणांनी केली सायकलद्वारे पर्यावरण जागृती
- निसर्ग : पाहुण्या पक्ष्यांचा ‘रुसवा’