World Cancer Day : जगभर रक्ताच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक! | पुढारी

World Cancer Day : जगभर रक्ताच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक!

कोल्हापूर; राजेंद्र जोशी : अनियमित जीवनशैली, वातावरणातील वाढते प्रदूषण आणि रसायनांच्या अतिवापरातून निर्माण झालेली खाद्यसंस्कृती यामुळे जगभराला कर्करोगाचा विळखा बसत चालला आहे. तथापि, योग्य वेळी निदान झाल्यास 80 ते 90 टक्के रुग्ण बरे होऊ शकतात. (World Cancer Day)

2020 ते 2022 या कालावधीत 8 टक्क्याने होणारी रुग्णसंख्या वाढ 2025 पर्यंत 14 टक्क्यांवर जाईल, असे अनुमान आहे. यामध्ये 0 ते 14 वयोगटातील बालकांमध्ये दिसून येणार्‍या रक्ताच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव हा जगातच चिंतेचा विषय ठरला आहे. या आजाराचे योग्यवेळी निदान आणि अत्याधुनिक उपचाराचा लाभ घेतला, तर सुमारे 80 ते 90 टक्के रुग्णांना आपला आजार पळवून लावता येणे शक्य आहे, असे मत प्रसिद्ध रक्तरोगविषयक तज्ज्ञ (हिमॅटॉलॉजिस्ट) डॉ. वरुण बाफना यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले. रक्ताच्या कर्करोगाचे बालकांमधील प्रमाण चिंताजनक वळणावर असले, तरी कोल्हापुरात यावर जगातील प्रगत अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना वा केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत यातील बहुतेक उपचार मोफतही होऊ शकतात, असे ते यावेळी म्हणाले. (World Cancer Day)

मानवी रक्तामध्ये असलेल्या अपरिपक्व पेशीत गुणसूत्रांमध्ये बदल झाले, तर पेशींची वाढ अनियंत्रित होते आणि नैसर्गिक पेशींच्या वाढीला या पेशी अटकाव करतात. साहजिकच नैसर्गिक पेशींचे काम कालांतराने थांबते आणि रुग्णाला मृत्यूच्या दाढेत जाण्यावाचून पर्याय रहात नाही. रक्ताच्या कर्करोगामध्ये ‘ल्युकेमिया’, ‘लिम्फोमा’, ‘मायलोमा’ असे तीन प्रकार आढळतात. याखेरीज मानवी हाडांच्या गाभ्यामध्ये (बोनमॅरो) जेथे मूळ पेशींचा उगम होतो, तेथेही अशाच प्रकारे अपरिपक्व पेशी परिपक्व पेशींची कोंडी करतात. रक्ताच्या कर्करोगाचे असे अनेक प्रकार आहेत. एकेकाळी या आजाराची बाधा झाली, की रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय हाय खात होते. पण आता विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे, की या आजारावर संपूर्णपणे मात करणे शक्य झाले नसले, तरी विज्ञानाने 80 ते 90 टक्के रुग्ण बरे करण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यावरील उपचार हे मोठ्या शहरांपुरते मर्यादित आणि ठराविक वर्गाला परवडणारे होते. तथापि, आता विज्ञान तंत्रज्ञानाने निमशहरांपर्यंत उपचाराच्या सुविधा उपलब्ध झाल्या. शासकीय योजनांनी त्याला आधार दिला. यामुळे आता सामान्य कुटुंबातील रुग्णांनी न खचता योग्य वेळी उपचाराला सामोरे गेले, तर या आजाराला भूतकाळात टाकता येणे शक्य आहे.

या आजाराच्या पाऊलखुणा ओळखण्यासाठी रुग्ण हाताळणी करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांनीही त्याची चाहूल वेळीच ओळखली, तर रक्ताच्या कर्करोगाला पळवून लावणे शक्य आहे.

मुलांमधील रक्ताच्या कर्करोगाचे प्रमाण वाढते असले, तरी त्यावर अत्याधुनिक उपचार पद्धतीद्वारे मात करणे शक्य आहे. यासाठी योग्य वेळी निदान झाले, तर आधुनिक उपचारांद्वारे कोल्हापुरातही उपचार होऊ शकतात. त्यातून 80 ते 90 टक्के रुग्ण बरे होऊ शकतात.
– डॉ. वरुण बाफना,
प्रसिद्ध हिमॅटॉलॉजिस्ट

Back to top button