Maharashtra Chitrarath : कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक | पुढारी

Maharashtra Chitrarath : कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या वतीने यंदा सादर करण्यात आलेल्या ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ति’ चित्ररथाला (Maharashtra Chitrarath)  दुसरा क्रमांक जाहीर झाला आहे. उत्तराखंडच्या चित्ररथाला प्रथम तर उत्तर प्रदेशने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

यावर्षी महाराष्ट्रासह १७ राज्यांची आणि विविध केंद्रीय मंत्रालयांची १० अशी एकूण २७ चित्ररथे कर्तव्यपथावर झळकली होती. महाराष्ट्र राज्याचे यापुर्वी ४० वेळा राजधानीत होणाऱ्या मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केली आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने राज्याच्यावतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्त‍ि’ या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ यंदा सादर करण्यात आला होता. या माध्यमातून नारी शक्ति, राज्यातील मंदिर शैली आणि लोककलाचा अमूर्त वारसा प्रदर्श‍ित करण्यात आला होता.

राज्यात (Maharashtra Chitrarath)  कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्त‍िपीठे आहेत. तर, वण‍ीची सप्तशृंगी हे अर्ध शक्त‍ीपीठ आहे.या शक्तिर्पीठांना स्त्री शक्त‍ीचे स्त्रोत मानले जाते. हे शक्तीपीठ यावर्षी चित्ररथाच्या माध्यमातून कर्तव्यपथावर दर्शविण्यात आले होते. चित्ररथाच्या पुढील दर्शनीय भागात गोंधळी, देवीचा भक्त संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती दर्शवण्यात आली होती. समोरील डाव्या व उजव्या भागात पांरपरिक लोककलेचे वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यांची मध्यम आकाराची प्रतिमा, त्यांच्यामागे फिरते मंदिर आणि यात साडेतीन शक्तिपीठांमधील देवींची प्रतिमा दर्शवण्यात आली होती.

पोतराज आणि हलगी वाजविणारे देवीचे भक्तांची दोन मोठी प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधले होते. चित्ररथाच्या दर्शनी भागात लोककलाकार आराधी, भोपी, पोतराज लोककला सादर करण्यात आली. चित्ररथाच्या मागील भागास नारी शक्तिचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्री प्रतिमा दर्शवण्यात आली होती. साडेतीन शक्तिपीठांचा महिमा सांगणारे “साडेतीन शक्तिपीठे दाखवित‍ी आम्हा दिशा….. गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या ” या गीताच्या तालावर चित्ररथासोबत डावी व उजवीकडे नृत्य सादर करणार्या कलाकारांनी सर्वांना भुरळ घातली होती.

महाराष्ट्राने सर्वात प्रथम सन १९७१ मध्ये ‘वारली दिंडी’ या विषयावर चित्ररथ सादर केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी १९७३ साली ‘ भारत छोडो आंदोलन ’ ही संकल्पना घेऊन या आंदोलनातील महत्वाच्या प्रसंगांचे चित्ररूप राजपथावर सादर केले होते.राज्य निर्मितीपासून अवघ्या १४ वर्षात राज्यांमध्ये विविध मोठे उद्योगधंदे स्थापीत झाले १९७४ च्या चित्ररथामध्ये याच उदयोगधंदयाचे प्रतिबिंब राजपथावर दिसले. पुढे १९७८ मध्ये ‘विविधतेत समानता’ असा चित्ररथ राजपथावर झळकला. तर वर्ष १९७९ मध्ये ‘बाल विकास ’ या विषयावर चित्ररथाच्या माध्यमातून बालविकासाचे धोरण दर्शविले.महाराष्ट्रामधील भौगोलिक भागानुरूप विविध सण साजरे केले जातात, असाच विषय धरून १९८० ‘महाराष्ट्रातील सण’ असा चित्ररथ साकारण्यात आला. १९८२ मध्ये राज्यातील समृद्ध ‘लोककला’ विषयावरील चित्ररथाने राजपथावरील प्रेक्षकांची मन जिंकली होती

हेही वाचा :  

Back to top button