बिहार : बँकेवरील सशस्त्र दरोडा सावित्रीच्या लेकींनी परतविला! | पुढारी

बिहार : बँकेवरील सशस्त्र दरोडा सावित्रीच्या लेकींनी परतविला!

वैशाली; वृत्तसंस्था : बिहारमधील वैशाली जिल्ह्यात सावित्रीच्या दोन्ही लेकींनी मोठ्या हिमतीने बँकेवरील सशस्त्र दरोडा परतावून लावला. बँक लुटायला आलेल्या गुंडांनी या दोघी महिला कॉन्स्टेबल्सवर रिव्हॉल्व्हर ताणल्या होत्या, या उपर त्या भ्यायल्या नाहीत. दरोडेखोरांना भिडल्या आणि सर्वांना अखेर पळवून लावले.

एक महिला पोलिस गुंडांना झुंज देत असताना दुसर्‍या महिला पोलिसाने रायफल लोड केली आणि दरोडेखोरांनी धूम ठोकली. बँकेत मोठी रोकड यावेळी होती. सदर पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्‍या सेदुआरी भागात बुधवारी ही थरारक घटना घडली. घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. दोन मोटारसायकलींवरून 5 दरोडेखोर बँकेत आले.

उत्तर बिहार ग्रामीण बँकेत सुरक्षेसाठी तैनात जुही कुमारी आणि शांती कुमारी या सदैव सावध असल्यानेच त्या या दरोडेखोरांचा मुकाबला करू शकल्या, हेही महत्त्वाचे. पाच गुंड जसे पोहोचले, तशा या दोन्ही जणींच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. दोन दरोडेखोर बाहेरच थांबले आणि तीन बँकेत शिरले. लगेच दोन्हींनी त्यांना हटकले, पासबुक दाखवा म्हणून दरडावले. दरोडेखोरांनी खिशातून रिव्हॉल्व्हर काढली आणि जुही कुमारी यांच्यावर ताणली. शांती कुमारीने उलट्या दस्त्याने प्रहार केला. दरोडेखोरांनी रायफल हिसकावण्याचाही प्रयत्न केला, पण जुही कुमारी यांनी तो यशस्वी होऊ दिला नाही. यादरम्यान शांती कुमारी या धावत बँकेच्या कर्मचारी कक्षात आल्या आणि त्यांनी सर्वांना सतर्क केले. रायफल लोड केली आणि दरोडेखोरांच्या दिशेने ताणली. दरोडेखोर घाबरले आणि मोटारसायकली तेथेच सोडून पसार झाले.

शौर्याला सलाम

पोलिस अधीक्षक मनीष यांनी दोघी महिला कॉन्स्टेबल्सना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. दोघी जणींना या झटापटीत दुखापतही झाली आहे.

अधिक वाचा :

Back to top button