बाळासाहेब पाटील, पुढारी ऑनलाईन : उत्तरप्रदेशातील निवडणुकांना अवधी असला तरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता हिंदू- मुस्लिम कार्ड खेळण्यास ( कब्रस्तान ते अब्बाजान ) सुरुवात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत थेट क्रबस्तान, रमजानचा उल्लेख करत धार्मिक ध्रुवीकरणाची बाब अधोरेखित केली तोच कित्ता आता योगी आदित्यनाथ 'अब्बाजान' असा उल्लेख करून करत आहेत.
२३ ऑगस्ट, २०१३ रोजी उत्तरप्रदेशातील संपूर्ण मुजफ्फरनगर बातम्यांमध्ये झळकू लागले. येथे दाेन गटात मोठ्या प्रमाणात दंगल उसळली होती. या दंगलीत ६० हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फायदा झाला.
आता या घटनेला जवळपास आठ वर्षे निघून गेली आहेत. लोकसभा निवडणुका लांब आहेत. तरी येथे काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे दंगलीसाठी सुपीक जमीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुजफ्फरनगरकडे लक्ष वळवले आहे.
योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेत्याने थेट हिंदू -मुस्लिम अशी धार्मिक विभागणी करण्यास सुरुवात केली आहे.
राज्याचा मुख्यमंत्रीच जर थेट विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत असेल तर भाजपचा आगामी निवडणुकीतील अजेंडा स्पष्ट दिसतो.
दिल्लीतील दंगलीवेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी समर्थकांना चेतवत गोली मारोच्या घोषणा दिल्या.
दिल्लीतील दंगलीच्या चार्टशीटवरून हायकोर्टाने दिल्ली पोलिसांना अक्षरश: अंगठे धरायला लावले.
मात्र, ना कोणती मोठी कारवाई झाली ना कुणाला भरपाई. यंत्रणा हाताशी असेल तर कशा पद्धतीने दंगलीच्या आगीवर निवडणुकांची पोळी भाजून घेता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे या दोन दंगली होय.
या सगळ्या नेत्यांना इतके बळ कुठून येते. मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती असे कसे बोलू शकतो असे आपल्याला वाटू शकते.
मात्र, सामान्य माणसांच्या राजकीय स्मृती धूसर असतात. शिवाय सध्याच्या माध्यमांचा मारा इतका आहे की, आपल्यासमोर सकाळी ऐकलेले सायंकाळी लक्षात ठेवायची अडचण होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१७ च्या निवडणुकीत प्रचार करताना म्हणाले होते, 'जर गावात क्रबस्तान बनत असेल तर स्मशानभूमी सुद्धा उभारली पाहिजे. जर रमजानमध्ये वीज मिळते तर दिवाळीतही वीज असली पाहिजे.' असे धक्कादायक वक्तव्य केले होते.
पंतप्रधान पदावरील व्यक्तीने हे सार्वजनिक व्यासपीठावरील वक्तव्य एकूणच भारतीय मूल्यांना सुरूंग लावणारे असले तरी भाजपने त्यावर मताधिक्याची पोळी भाजून घेतली.
योगी आदित्यनाथ आताही त्याच वाटेवरून ( कब्रस्तान ते अब्बाजान ) चालले आहेत.
योगी आदित्यनाथ हे कुशीनगर च्या दौऱ्यावर होते. त्यावेळी समजावादी पक्षावर टीका करताना त्यांनी 'अब्बाजान म्हणणारे लोक तुमचे राशन लाटत होते.' असा खडा टाकून पाहिला. त्याचे तरंग आता उत्तरप्रदेश आणि बिहार येथे उमटत आहेत.
याप्रकरणी आता बिहारच्या कोर्टात तक्रार दाखल केली आहे.
मुजफ्फरनगरच्या सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशमी यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ हे धार्मिक भावना भडकवत आहेत, असा आरोप करत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी चार कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. राज्याचा मुख्यमंत्री जर थेट एका समुदायाला टार्गेट करून बोलत असेल तर मागील इतिहास पाहता गर्भित इशारा आहे.
उत्तर प्रदेशात दीर्घकाळ सत्ता गाजवलेले समाजवादी पक्ष आणि बहुजन जनता पक्ष चाचपडत आहेत.
काँग्रेस अजून नेतृत्वाच्या शोधात आहे. त्यामुळे भाजपला अजून एक संधी मिळेल असे बोलले जाते.
किंबहुना असा दावा अनेक राजकीय कार्यकर्ते करत असतात. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही.
गेल्या १० महिन्यांपासून पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेत.
बेदखल केल्याने हे आंदोलन महिन्याभरात मोडेल असे वाटत होते मात्र, तसे झाले नाही. पंजाबमध्ये भाजपच्या आमदारांना पार कपडे फाटेपर्यंत अनेकदा मारहाण झाली आहे.
तर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना सार्वजनिक कार्यक्रमांतून काढता पाय घ्यावा लागत आहे.
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचा धुव्वा उडाला.
मे महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांत भाजपला समाजवादी पक्षाची पिछेहाट झाली.
सपाला ७४७, भाजपला ६९०, बसपला ३८१, काँग्रेसला ७६ तर राष्ट्रीय लोकदलाला ६० जागा मिळाल्या होत्या.
बुंदेलखंडातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात होत्या मात्र, तेथेही मोठा फटका बसला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघ, आयोध्या आणि मथुरेत हिंदूबहुल भागात भाजपला मोठा धक्का बसला आहे.
या मतदारसंघांत अनेक मंत्री प्रचारासाठी उतरले होते. अनेक गोष्टींची तैनाती केली होती. मात्र, भाजपला येथेही मतदारांनी नाकारले.
अयोध्या, वाराणसी, प्रयागराज, मथुरेत पक्षाचे अनेक नेते, आमदार आणि मंत्र्यांचे नातेवाईक निवडणूक हरले आहेत.
या सर्व बाबींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे बारीक लक्ष आले.
त्यामुळे मध्यंतरी योगी आदित्यनाथ यांच्यावर गदा येण्याची शक्यता असल्याचे मानले जात हाेते. मात्र, आदित्यनाथ यांच्यासारख्या संन्याशाने या दोन्ही वजनदार नेत्यांच्या दबावाला जुमानले नाही.
तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी त्यांची समजूत काढली.
एकीकडे सहा महिन्यात चार मुख्यमंत्री बदलण्याची किमया करणाऱ्या या दोन वजनदार नेत्यांना आदित्यनाथ यांच्यासमोर हात टेकावे लागले.
या नेत्यांची आता मोठी गोची झाली आहे. सत्ता आली तर आदित्यनाथ यांचा दावा असेल आणि आदित्यनाथ नको असतील तर सत्तेवर पाणी सोडावे लागेल अशा गोचीत भाजपचे शीर्ष नेतृत्व आहे.
उत्तर प्रदेशातील राजकारण नेहमीच जाती, धर्मावर आधारित राहिले आहे. समाजवादी पक्ष मुस्लिमांचे लाड करतो, बसप मागासवर्गीयांना झुकते माप देतो असा आरोप केला जातो. त्यात तथ्यही आहे. भाजपने या दोन्ही जातीधर्मांना बाजुला ठेवत थेट आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा
( कब्रस्तान ते अब्बाजान ) पुढे रेटला आणि तो यशस्वी झाला.
गेल्या अनेक वर्षांत सपा आणि बसपने केलेल्या जातीय राजकारणाचे फलित म्हणजे भाजपचे हिंदुत्ववादी राजकारण आहे, असे अनेक राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक सारख्या राज्यांसारखे येथे सोशल इंजिनीअरिंग कधीच झाले नाही. जे झाले ते जातींची विभागणी करूनच. या सर्व बाबींची पुरेपूर जाणीव असल्याने योगी आदित्यनाथ यांनी आता कट्टर हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढले आहे. मथुरेत त्यांनी मांस आणि मद्यविक्री बंद करून हिंदूंचा चुचकारले आहे. मात्र, या गल्लीपातळीवरील योजना मुख्यमंत्रिपदावरील व्यक्ती जर जाहीर करत सुटत असेल तर त्या योजना जनता कितपत स्वीकारते याकडे लक्ष लागले आहे.
देशातील एका मोठ्या दैनिकात उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी जाहिरात दिली होती. या जाहिरातीत कोलकाता येथील पुलाचा फोटा वापरून हा पूल उत्तरप्रदेशातीलच आहे, असे सांगितले. ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅजर्जी यांनी आदित्यनाथ यांची पोलखोल करत ट्विट केले. त्यानंतर सरकारचे हसे झाले. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? असे म्हणत प्रचंड टीका झाली. त्यानंतर सारवासारव करत संबधित जाहिरातीचे खापर दैनिकावर फोडले आणि ही आमची चूक नाही, असे सांगून हात झटकले. यामुळे आदित्यनाथ यांना सांगण्यासारखे काही नाही हे उघड असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
कोरोना काळात उत्तर प्रदेशात रुग्ण मृत्यू माेठ्या प्रमाणावर झाले. या मृततेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळत नव्हती. अनेक मृतदेह गंगेत सोडून दिले. या मृतदेहांचा खच नदीत पडला होता. त्यावरून देशपातळीवर उत्तर प्रदेशचे हसे झाले. याची चर्चा जागतिक पातळीवरही झाली. ज्या राज्यात अंत्यसंस्काराला जागा मिळत नाही तेथे उपचार काय झाले असतील, हा संशोधनाचा विषय असू शकतो.
एकूणच सध्या भाजप बॅकफूटवर असल्याचे लक्षात येताच आदित्यनाथ यांन जुने कार्ड बाहेर काढत ( कब्रस्तान ते अब्बाजान ) आगामी धार्मिक ध्रुवीकरणाची चुणूक दाखवून दिली आहे.
हेही वाचलं का ?