लियोनेल मेस्सी बाहेर पडल्यानंतर बार्सिलोनाचा पराभव | पुढारी

लियोनेल मेस्सी बाहेर पडल्यानंतर बार्सिलोनाचा पराभव

बार्सिलोना; वृत्तसंस्था : स्टार फुटबॉल खेळाडू लियोनेल मेस्सी बाहेर पडल्यानंतर झालेल्या पहिल्याच सामन्यात बार्सिलोनाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. चॅम्पियन्स लीगमध्ये बर्सिलोनाला पहिल्याच सामन्यात बायर्न म्युनिच संघाकडून निराशाजनक पराभवास सामोरे जावे लागले. थॉमस म्यूलरचा एक गोल आणि रॉबर्ट लेवांडोवस्कीच्या शानदार 2 गोलच्या मदतीने बायर्नने बार्सिलोनाचा 3-0 ने धुव्वा उडविला.

गेल्या महिन्यात लियोनेल मेस्सीने सलग 21 वर्षे खेळल्यानंतर बार्सिलोना संघाला अलविदा म्हटले होते. मेस्सी सध्या पॅरिस सेंट-जर्मेन संघाकडून खेळत आहे. 34 व्या मिनिटाला म्यूलरने तर लेवांडोवस्कीने 56 व 85 मिनिटाला गोल केला.

लियोनेल मेस्सीने वर्ल्ड कप पात्रता सामन्यात गोल्सची हॅटट्रिक करीत अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला आहे. मेस्सीने केलेल्या जबरदस्त खेळीमुळे अर्जेंटिनाने 3-0 ने बोलिव्हियाचा पराभव केला. या हॅटट्रिकसोबतच मेस्सीने ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांचा सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला आहे.

दक्षिण अमेरिकी फुटबॉलच्या इतिहासात लियोनेल मेस्सी सर्वाधिक गोल करणारा आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू ठरला आहे. 34 वर्षीय मेस्सीच्या नावे 79 गोल्सची नोंद झाली आहे. आतापर्यंत 77 गोल्ससह पेले सर्वाधिक गोल्स करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू होते. मेस्सीने सामन्याच्या 14 व्या, 64 व्या आणि 88 व्या मिनिटाला गोल केले.

अर्जेंटिनाकडून 153 वा सामना खेळताना मेस्सीने पहिला गोल करतच पेले यांच्या सर्वाधिक गोल्सची बरोबरी केली. यानंतर मार्टिनेजने दिलेल्या पासवर गोल करीत मेस्सीने पेले यांचा विक्रम मोडत नवा विक्रम केला.
आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅटट्रिक करण्याची मेस्सीची ही सातवी वेळ आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल्स करण्याचा विक्रम मेस्सीचा प्रतिस्पर्धी रोनाल्डोच्या नावे आहे. रोनाल्डोने 180 सामन्यांमध्ये 111 गोल केले आहेत.

अर्जेंटिनाला हा विजय चार दिवसांपूर्वी झालेल्या वादानंतर मिळाला आहे. सोमवारी अर्जेंटिना आणि ब्राझीलचा सामना सुरू झाल्यानंतर सात मिनिटांनी रद्द करण्यात आला होता. अर्जेंटिनाच्या चार खेळाडूंनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला होता. यावेळी दोषी आढळलेले खेळाडूंना बोलिव्हियाविरोधातील सामन्याचा भाग नव्हते.

Back to top button