PLI Scheme : वाहन तसेच ड्रोन उद्योगासाठी PLI योजना जाहीर | पुढारी

PLI Scheme : वाहन तसेच ड्रोन उद्योगासाठी PLI योजना जाहीर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : PLI Scheme : वाहन तसेच ड्रोन उद्योगासाठी उत्पादन आधारित सवलतीची (पीएलआय) योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

या योजनेमुळे वाहन उद्योगाला 25 हजार 929 कोटी रुपयांचा लाभ मिळणार असून सुमारे साडेसात लोकांना नव्याने रोजगार मिळेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

दरम्यान, सरकारने ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी 120 कोटी रुपयांची पीएलआय योजनादेखील जाहीर केली आहे.

अ‍ॅडव्हान्स्ड् ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजिसमध्ये भारत जागतिक सप्लाय चेन बनावा, या दृष्टीने सरकार प्रयत्न करीत आहे. वाहन उद्योगासाठी सादर करण्यात आलेली पीएलआय योजना हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगून ठाकूर पुढे म्हणाले की, पाच वर्षे कालावधीसाठी राबविल्या जाणार्‍या या योजनेमुळे वाहन उद्योगात 42 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे.

याशिवाय 2.3 लाख कोटी रुपयांची वाढीव उत्पादने देशात बनतील. मोठ्या कंपन्यांना पीएलआय योजनेचा फायदा घेण्यासाठी पुढील दोन वर्षांच्या कालावधीत दोन हजार कोटी रुपयांची तर मोटारसायकल बनविणार्‍या कंपन्यांना एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

त्याचप्रमाणे सुटे भाग तयार करणार्‍या कंपन्यांना त्यांच्या उलाढालीनुसार वेगवेगळ्या श्रेणीत पीएलआय योजनेचा फायदा उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

वाहन उद्योगाच्या पीएलआय योजनेचा फायदा प्रामुख्याने वाहनांचे सुटे भाग बनविणार्‍या कंपन्या तसेच इलेक्ट्रिक- हायड्रोजन फ्युएल व पर्यायी इंधनावर चालणार्‍या गाड्यांच्या उत्पादकांना मिळणार आहे.

पीएलआय योजनेअंतर्गत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, ऑटोमॅटिक ब्रेकिंग, इलेक्ट्रॉनिक स्टीअरिंग सिस्टिम आदी सुटे भाग बनविणार्‍या कंपन्यांना सवलत दिली जाईल.

दरम्यान, वाहन निर्मिती कंपन्यांची संघटना असलेल्या सियामने सरकारच्या पीएलआय योजना आणण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. वाहन क्षेत्राला नवी दिशा मिळण्यास यामुळे मदत मिळेल, असा विश्वास सियामकडून व्यक्त करण्यात आला आहे.

चीनप्रमाणे भारत निर्मिती क्षेत्रात हब बनावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. इलेक्ट्रिक वाहने बनविणारी आघाडीची कंपनी टेस्ला तसेच इतर कंपन्यांना सरकारच्या पीएलआय योजनेचा फायदा होणार आहे.

दरम्यान, ड्रोन उद्योगासाठी सादर करण्यात आलेल्या योजनेमुळे पुढील तीन वर्षात या क्षेत्रात पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे. याशिवाय सुमारे 1500 कोटी रुपयांची वाढीव उत्पादने बाजारात येतील, असे ठाकूर यांनी सांगितले.

Back to top button