आचरा : चिंदर येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला, आकस्मिक मृत्युची नोंद | पुढारी

आचरा : चिंदर येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला, आकस्मिक मृत्युची नोंद

आचरा; पुढारी वृत्तसेवा : चिंदर- नागोचीवाडी येथून बेपत्ता महिलेचा कुजलेल्या स्थितीतील मृतदेह चिंदर-मुरूमखणी भागात बुधवारी सकाळी आढळून आला. हा मृतदेह चिंदर नागोचीवाडी येथील बेपत्ता कल्पना कृष्णा पडवळ (वय 52) हिचा असल्याचे निष्पन्न झालेे. ही महिला मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत 22 ऑगस्टपासून बेपत्ता झाली होती. याबाबतची फिर्याद तिचे पती कृष्णा पडवळ यांनी आचरा पोलिस ठाण्यात दिली होती.

आचर्‍याचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर यांनी दुपारी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची पाहणी केली. या घटनेची आचरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

मनोरुग्ण असलेल्या कल्पना पडवळ या 22 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 6 वा. घरात कोणालाही न सांगता बाहेर गेल्या. त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिची गावात, नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र, आढळून न आल्याने तिचे पती कृष्णा पडवळ यांनी आचरा पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी गावातील काही तरुण मुरूमखणी भागात माळरानावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. या युवकांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी कारणांचा शोध घेतला असता त्यांना सडलेल्या अवस्थेतेतील मानवी मृतदेह दिसून आला. तरुणांनी लागलीच वाडीत धाव घेत याची माहिती वाडीतील ज्येष्ठ ग्रामस्थांना दिली.

अंगावरील दागिने, चप्पल, साडीवरून पटली ओळख

घटनास्थळी सहायक पोलिस उपनिरीक्षक कुलदीप पाटील यांच्या समवेत पोलिस हेड कॉन्स्टेबल मीनाक्षी देसाई, बाळू कांबळे, महेश देसाई, अनिकेत सावंत, अविताज भाबल, अक्षय धेंडे दाखल झालेत. चिंदर ग्रामपंचायत सदस्या दुर्वा पडवळ, माजी सरपंच संतोष कोदेही हजर होते.

पोलिसांची घटनास्थळी पाहणी

पोलिसांनी घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांसमवेत पाहणी केली असता मृतदेहाच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील दागिने, हातातील बांगड्या, पायातील चप्पला, अंगावरील साडी यामुळे तो मृतदेह बेपत्ता कल्पना पडवळ यांचा असल्याची खात्री पटली. त्यानंतर घरातील नातेवाईकांना मृतदेह दाखविला असता मृतदेह बेपत्ता कल्पना पडवळ यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

कुजलेल्या अवस्थेत मानवी मृतदेह मिळाल्याचे समजल्यानंतर कणकवलीचे डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर घटनास्थळी दाखल झालेे. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत सहायक पोलिस उपनिरीक्षक कुलदीप पाटील यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. मालवण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल साळुखे यावेळी उपस्थित होते. त्यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
दिला.

या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत. श्रीमती पडवळ यांच्या पश्चात नवरा, दोन मुली, सासू, नणंद, दीर असा परिवार आहे.

Back to top button