मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याच्या इशार्यावर ऐन सणासुदीत घातपात घडवण्यासाठी मुंबईची रेकी करण्यापूर्वीच पाकिस्तानने प्रशिक्षित केलेले सहा अतिरेकी जेरबंद झाले, असा दावा महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनित अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, पुढारीला मिळालेल्या माहितीनुसार, जान मोहम्मद ऊर्फ समीर कालिया (Jaan Mohammad Shaikh) हा धारावीतूनच 'स्लीपर सेल' चालवत होता. अचानक तो गायब व्हायचा आणि गावी गेले होतो म्हणून सांगायचा. (Pakistan-trained terror module: Jaan Mohammad Shaikh was also on our radar, says Maharashtra ATS chief)
मुंबई पुन्हा हादरवून सोडण्याचा दाऊदचा डाव उधळला गेला असला तरी मुंबईकरांना हा मोठा धक्का आहे. मुंबईत सणासुदीत स्फोट घडवण्याचे कारस्थान रचले जाते आणि कानोकान खबर नसताना अचानक धारावीतून पाक प्रशिक्षित अतिरेकी दिल्ली पोलिसांकडून गजाआड होतो हा क्रमच चक्रावून टाकणारा आहे.
पुढारीचे धारावीतील प्रतिनिधी अरविंद कटके यांनी बुधवारी समीर कालियाचा (Jaan Mohammad Shaikh) संपूर्ण परिसर पिंजून काढला. सर्वत्र सन्नाटा आहे. आता कुणाला अटक होते या प्रश्नाने दहशत पसरली आहे. मंगळवारी रात्रभर समीर कालियाची पत्नी रुखसार जान मोहम्मद, मुलगी आफरीन जान यांना एटीएसने ताब्यात ठेवले.
समीर कालियाला रेल्वेचे तिकीट काढून देणारा असगर शेखला धारावीच्या एमजी रोडवरील मिलन नगरमधून चौकशीसाठी उचलले. मात्र, कालियाच्या कुटुंबासह त्याचीही बुधवारी सकाळी सुटका झाली. कालियाचा जवळचा मित्र सुनील बटला याला मात्र एटीएसने अजूनही सोडले नसल्याचे समजते.
धारावीच्या एमजी रोडवरील सोशल नगरात मदिना मश्जिदीच्या पाठीमागे कालिया राहतो. अत्यंत चिंचोळ्या गल्लीत राहणार्या त्याच्या कुटुंबाचा अतिरेकी कारवायांशी संबंध अद्याप आढळला नसला तरी अत्यंत गुप्तपणे याच घरातून कालिया अतिरेक्यांसाठी स्लीपर सेल चालवत असे. अंडरवर्ल्डशी आणि खास करून दाऊद टोळीशी त्याचा सतत संपर्क असे.
अधूनमधून तो गावी जाण्याचा बहाणा करून गायब व्हायचा. धारावीत तो राहतो त्या भागात त्याचा कुणालाही त्रास नसल्याने त्याच्यावर कधी कुणी संशय घेतला नाही. गल्लीत कुणालाही कधी धमकी देखील न देणारा कालिया देशभर बॉम्बस्फोटांचे धमाके घडवण्याचे कारस्थान रचत होता यावर कुणीही विश्वास ठेवण्यास तयार नाही. मात्र, हे कारस्थान उघड झाल्याने सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला आहे.
कालियाला तिकीट काढून देणारा असगर शेख हा तिकीट एजंट म्हणूनच काम करतो. पुढारीने त्याच्याशी संपर्क केला. तो म्हणाला, कालियाच्या उद्योगांशी माझा काही संबंध नाही. 10 सप्टेंबरला तो माझ्या दुकानावर निजामुद्दिनचे तिकीट काढण्यासाठी आला. किती पैसे लागतात विचारले आणि गेला. 12 तारखेला तो पुन्हा आला. पैसे देऊन 13 तारखेचे मुंबई सेंट्रल ते निजामुद्दिन तिकीट काढले. 9 महिन्यांपूर्वी अजमेर शरिफ दर्ग्याला जायचे म्हणून त्याने संपूर्ण कुटुंबाचे तिकीट काढले होते. या दोन तिकीटांपुरतीच आमची ओळख असल्याचे असगर सांगतो.
महाराष्ट्रासह दिल्ली आणि उत्तर प्रदेशात निरनिराळ्या ठिकाणी घातपात घडवण्याचा कट उधळून लावत दिल्ली पोलिसांनी मुंबईत धारावी गाठली आणि 20 वर्षांपासून दाऊद गँगशी संबंध असलेला जान मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालियाला बेड्या ठोकल्या. ही कारवाई होईपर्यंत एटीएस झोपली होती का, असा सवाल केला आणि राज्यातील तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मात्र, समीर कालियाला धारावीत नव्हे तर राजस्थानातील कोट्याहून दिल्लीकडे रेल्वेने जाताना अटक करण्यात आली. त्याच्यावर घातपात घडवण्याच्या ठिकाणी स्फोटके व शस्त्रास्त्रे पोहोचवण्याची जबाबदारी दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमने टाकली होती हे दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आधीच स्पष्ट झाले आहे.
बुधवारी या संदर्भात खास पत्रकार परिषद घेत अग्रवाल यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी मुंबईत कोणतीही रेकी केली नव्हती. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या एका व्यक्तीने मुंबईते रेकी केल्याच्या बातमीत तथ्य नाही. या प्रकरणी दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र एटीएस मिळून कारवाई केली जाईल, आमचे एक पथक दिल्लीकडे रवाना झाले आहे. हे पथक कालियाची चौकशी करेल. दिल्ली पोलीस आणि आमच्यात माहितीची देवाण-घेवाण होईल, असे अग्रवाल म्हणाले.
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करत दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जान मोहम्मद शेख, मोहम्मद अबु बकर, मो. आमीर जावेद, मूलचंद लाला, झिशान कमर, ओसामा उसैद उर रहेमान या अतिरेक्यांना अटक केली. त्यातील धारावीचा जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया (47) याचे 20 वर्षांपूर्वी कुख्यात मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहीम याच्या 'डी' गँगशी संबंध होते.
त्याच्या विरोधात मुंबईत पायधुनी पोलीस ठाण्यात चोरी, गोळीबार, मारहाण आदी गुन्हे दाखल असून तो राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) रडारवर होता.
त्याला 9 तारखेला दिल्लीतील निजामुद्दीनला जायचे होते; मात्र तिकीट मिळाले नाही. अखेर तात्काळ कोट्यामध्ये गोल्डन टेम्पल एक्स्प्रेसचे तिकीट त्याने काढले.
तिकीट कन्फर्म होताच 13 तारखेला तो मुंबईतून एकटाच निजामुद्दीनसाठी निघाला.
गाडी राजस्थानमधील कोटा स्थानकात पोहोचताच त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कुठलेही शस्त्र अथवा स्फोटके नव्हती, असे अग्रवाल यांनी सांगितले.
समीर कालिया कर्जबाजारी झाला होता. पैशांसाठीच त्याने दहशतवादाचा मार्ग धरल्याचा एटीएसला संशय आहे.
तो वाहन चालक म्हणून काम करत होता. ती नोकरी सुटल्यानंतर त्याने कर्ज काढून टॅक्सी घेतली.
कर्जाचा हप्ता थकल्यामुळे बँकेने टॅक्सी उचलून नेली. त्याने पुन्हा कर्ज काढून दुचाकी खरेदी केली.
पैशांची गरज असल्यामुळेच कदाचित तो या कामासाठी तयार झाला असावा, या शक्यतेतून एटीएस अधिक तपास करत असल्याचे अग्रवाल म्हणाले.
केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यासाठी, विद्यमान आमदाराविरुद्ध (नितेश राणे) लुकआऊट नोटीस जारी करण्यासाठी, पत्रकारांना दमदाटी करण्यासाठीच्या किरकोळ कामात पोलिसांना अडकवून ठेवल्याने दहशतवादी मुंबईत असताना दिसला नाही. हा भाजप नेते आशिष शेलारांचा आरोप गृहमंत्री दिलीप वळेस पाटील यांनी धुडकावला.
कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याआधी ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत, त्या परिस्थितीत सर्वांनी पोलिसांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.
अजिबात त्यांना दुसर्या कोणत्या गोष्टींसाठी अडकून ठेवलेले नाही, असे प्रत्युत्तर वळसे पाटील यांनी दिले.
अतिरेक्यांच्या कारवाई प्रकरणी गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप फेटाळत वळसे पाटील म्हणाले, आपणही इतर राज्यात जाऊन तशी कारवाई करतो.
जर माहिती परिपक्व असेल आणि स्थानिक ठिकाणाहून कुणाला अटक करायची असेल. तर स्थानिक पोलिसांना अवगत केले जाते.
पण माहिती गोळा करत असताना थेट अटक करण्याचे अधिकार देखील पोलिसांना आहेत. त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केलेली आहे, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
यातले फार बारकावे मला सांगता येणार नाहीत. त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो.