न खेळताही विराट कोहलीच्या टी-२० क्रमवारीत सुधारणा - पुढारी

न खेळताही विराट कोहलीच्या टी-२० क्रमवारीत सुधारणा

दुबई; वृत्तसंस्था : आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीने बुधवारी घोषित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली ला एका स्थानाचा फायदा झाला आहे. टी-20 मध्ये फलंदाजी क्रमवारीत कोहली चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

त्याने न्यूझीलंडच्या डेवॉन फिलीप कॉन्वेला मागे टाकले आहे. विराट कोहली चे 717 तर कॉन्वेचे 700 रेटिंग गुण आहेत. कोहलीने आपला शेवटचा टी-20चा सामना इंग्लंडविरुद्ध 20 मार्च 2021 रोजी अहमदाबाद येथे खेळला होता. टी-20 क्रमवारीत टॉप टेनमध्ये के. एल. राहुलही आहे.

699 गुणांसह राहुल सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान (841) अद्यापही अव्वलस्थानी कायम आहे. दुसर्‍या स्थानावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (819) तर, तिसर्‍या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅरोन फिंच (733) आहे.

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-20मालिकेत शानदार कामगिरी करणार्‍या यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन-डी-कॉक 12 व्या स्थानावरून थेट आठव्या स्थानी पोहोचला आहे.

Back to top button