सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वृद्धाचा खून | पुढारी

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वृद्धाचा खून

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल लमधील बी ब्लॉकमध्ये 70 वर्षीय अनोळखी निराधार बेघर रुग्णाचा डोक्यात रॉड घालून खून करण्यात आला. याप्रकरणी संशयित युसूफ मौलाली पिरजादे (वय 30 रा. 70 फूट रोड) याला अटक करण्यात आली. किरकोळ कारणावरून वादानंतर ‘मुझे इसमे शैतान दिखता है’ असे म्हणत संशयिताने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी डॉ. सौरभ राऊत यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 70 वर्षीय वृद्धाला जेऊर (ता. अक्कलकोट) येथून रुग्णवाहिका 108 मधून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल मधील बी ब्लॉकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या शेजारी युसूफ पिरजादे हा रुग्ण होता.

त्या दोन्ही रुग्णांमध्ये सोमवारी (13 सप्टेंबर) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यावेळी ‘मुझे इसमे शैतान दिखता है’ असे म्हणून युसूफ याने रागाच्या भरात वृद्धाच्या डोक्यात तेथीलच सलाईनच्या लोखंडी रॉडने वार केले. तेथे ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, कर्मचार्‍यांसमोरच अचानक घडलेल्या या प्रकाराने सर्वांची धावपळ उडाली.

यावेळी कर्मचार्‍यांनी युसूफला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने केलेल्या हल्ल्यात वृद्ध रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले; पण उपचारादरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

यावेळी सहायक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे व सदर बझार पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी युसूफ पिरजादे याला पोलिसांनी अटक केली.

Back to top button