फोर्ड कंपनीने प्लँट बंद केल्यानंतर कर्मचारी, वाहनधारक धास्तावले | पुढारी

फोर्ड कंपनीने प्लँट बंद केल्यानंतर कर्मचारी, वाहनधारक धास्तावले

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : वाहन निर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठ्या फोर्ड कंपनीने भारतातील प्लँट बंद केल्यानंतर कर्मचारी आणि वाहनधारकांना मोठा धक्का बसला आहे.

वाहनांची कमी विक्री, कोरोना काळ यामुळे कंपनी मेटाकुटीला आली होती. फोर्डचे भारतात दोन प्लांट होते. त्यापैकी एक प्लँट देण्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून होती.

परंतु दोन्ही प्लँट बंद करण्याची तयारी कंपनीने त्या आधीपासूनच केली होती.

कंपनीने या कार मालकांना सर्वप्रकराची सेवा देण्याचे आश्वासन दिलेले असले तरीदेखील जनरल मोटर्सनंतर फोर्डचे जाणे धक्कादायक आहे.

आता फक्त फोर्डकडे एक हजार कार उरल्या आहेत.

फोर्डने फ्रीस्टाईल, फिगो, अस्पायर, ईकोस्पोर्ट, एंडेव्हर या कारचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे.

परंतु या कारची उत्पादने आधीच थांबविण्यात आली होती.

फोर्डने डिझेल मॉडेलचे उत्पादन तीन महिने आधीच थांबविले होते. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बहुतांश डीलर पेट्रोल मॉडेलच्याच गाड्या विकत होते.

अस्पायर सीएनजी, इकोस्पोर्टचे फेसलिफ्ट या गाड्या येणार असल्याचे कंपनी सांगत होती. यावर कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवला.

नव्या तंत्रज्ञानासह कंपनी गाड्या लाँच करेल आणि गेल्या दोन वर्षांपासून गाळात असलेली कंपनी बाहेर येईल, असा विश्वास कर्मचाऱ्यांना होता.

मात्र, कंपनीने कर्मचाऱ्यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेतला. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर सध्या तरी अंधार आहे. गेल्या वर्षभरात अनेक कर्मचाऱ्यांनी कंपनी बदलली.

परंतु, काहींनी डीलर आणि कंपनीवर विश्वास ठेवून तेथेच राहिले. त्याचा मोठा फटका बसला आहे.

आता दुसऱ्या कंपनीशिवाय त्यांना पर्याय राहिलेला नाही. मात्र, वेतन आणि अन्य सोयी मिळणार नसल्याने कर्मचारी निराश झाले आहेत.

वाहन मालकांसमोर चिंता

फोर्डसारख्या कंपनीची गाडी घेतल्याने खूश असलेले मालक आता चिंतेत आहेत.

छोट्या छोट्या शहरांत उघडलेली सर्व्हिस सेंटर्स बंद केली तर काय करायचे? असा सवाल त्यांच्यासमोर आहे.

सर्व्हिससाठी मोठ्या शहरांत जाण्याच भुर्दंड, महागडे स्पेअरपार्ट आणि मनमानी फी वसूल करण्याची भीती आहे.

या कारची रिसेल व्हॅल्यू कमी होती, आता कंपनीने भारतातून काढता पाय घेतल्याने आहेत त्या गाड्याही कोणी घेणार नाही.

सर्व्हिस सेंटर्स सुरु, डीलरशीप बंद

फोर्डची कार विक्रीसाठीच नसल्याने डीलरशीप बंद होणार आहेत. मात्र, भारतात मोठ्या प्रमाणात गाड्या असल्याने त्यांची सर्व्हिस सेंटर सुरु राहणार आहेत.

मस्तंग, एंडोव्हर इम्पोर्ट होणार असल्याने या कारचा जिथे सेल होता, तेथील आणि महत्त्वाच्या शहरांतील डीलरशीप सुरु राहतील.

परंतु छोट्या कार उत्पादित होणार नाहीत त्यामुळे त्या मिळणार नाहीत.

कर्मचारी निराश

फोर्ड कंपनीने प्लँट बंद  केल्यानंतर कर्मचाऱ्यांना अन्य कंपन्यांच्या सर्विहस सेंटर किंवा शोरुममध्ये नोकरीची ऑफर आहे.

पण निम्मा पगार आणि अन्य सुविधांना कात्री लावली आहे. त्यामुळे कर्मचारी निराश झाले आहेत.

हेही वाचा: 

Back to top button