डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : मंत्रालयीन अधिकाऱ्याला महिलांनीच चोपले : सामाजिक संस्थेची नोंदणी करून देण्याचा बहाण्याने महिलेशी सोशल मीडियावर मैत्री केल्यानंतर महिलांशी अश्लील संभाषण करणाऱ्या एका मंत्रालयातील अधिकाऱ्याला पीडित महिलांनी चांगलाच चोप दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शिवाजी आव्हाड असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी महिलांनी पोलिसांकडे दाद मागितली असता पोलिसांनी या अधिकाऱ्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई केली.
तथापि पोलिसांनी या अधिकाऱ्याविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल पीडित महिलेने उपस्थित केला. दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून आणखी काही तक्रार असेल तर महिलेला बोलावले असून त्यानुसार गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बदलापूर परिसरात राहणारी पीडित महिला एका सामाजिक संस्थेत काम करते. काही दिवसांपूर्वी मंत्रालयात अधिकारी पदावर काम करणाऱ्या शिवाजी आव्हाड नामक इसमाने सोशल मीडियावर या महिलेशी मैत्री केली. स्वतःची सामाजिक संस्था नोंदणी करून देतो, असे सांगत तिच्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला.
या पीडित महिलेच्या मैत्रिणीला देखील नगरसेविका बनवतो, असे आमिष दाखवून तिच्याशी फोनवर अश्लील संभाषण केले. त्यानंतर आव्हाडने या महिलांना फोन करून कल्याणातील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. संतापलेल्या पीडित महिलांनी त्याला त्याच हॉटेलमध्ये गाठून चांगलाच चोप दिला.
या मारहाणीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीडित महिलांनी यथेच्छ बदडून आव्हाड याला महात्मा फुले चौक पोलिसांच्या स्वाधिन केले. मात्र पोलिसांनी आव्हाड विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
पोलिसांच्या कारवाईबाबत पीडित महिलेने पोलिसांनी जिथे राहता त्या ठिकाणी जाऊन तक्रार दाखल करा असा सल्ला दिला. पोलिसानी गुन्हा का दाखल केला नाही ? असा सवाल करत पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
महात्मा फुले चौक पोलिसांनी मात्र महिलेच्या तक्रारीनुसार कारवाई केल्याचे सांगून तिला फोन करून तक्रार केली का याबाबत विचारल होते. पीडित महिलेला आज बोलावले असून तिच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगितले.
हे ही वाचलं का?