दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना आचरा परिसरात भावपूर्ण निरोप | पुढारी

दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना आचरा परिसरात भावपूर्ण निरोप

आचरा : उदय बापर्डेकर

आचरा परिसरात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना शनिवारी सायंकाळी सर्वत्र भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या… या घोषणा देत भाविकांनी आपल्या बाप्पाचा निरोप घेतला. शुक्रवारपासून सर्वत्र गणेशोत्सवाला मोठ्या थाटात प्रारंभ झाला.त्यामुळे सर्वत्र वातावरण भक्तिमय झाले आहे.

दरवर्षी गणरायाच्या विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येतात. ढोल-ताशे वाजवत, फटाके फोडत मिरवणुका काढल्या जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या सर्वांवर बंदी घातल्याने नागरिकांनी दीड दिवसांच्या गणरायाला साधेपणाने निरोप दिला आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुन तसेच सोशल डिस्टंसिंग, मास्क परिधान करुन गणपती विसर्जन केले. आचरा येथे पारवाडी येथील नदीकाठी, गाऊडवाडी, हिर्लेवाडी , डोंगरेवाडी , आचरा बीचवर अशा विविध ठिकाण भाविकांनी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले.

आचरा परिसरात गणपती विसर्जनस्थळी निर्माल्य कुंड उभारण्यात आली आहेत या कुंडाचा गणपती विसर्जनवेळी ‘श्रींचे’ निर्माल्य टाकण्यासाठी गणेश भक्तांनी वापर केला.

गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी कुणी बाप्पासोबत फोटो काढला तर कुणी सेल्फी काढला आणि त्यानंतर गणरायाचा निरोप घेतला. घरातून गणरायाची मूर्ती घेऊन भाविक निघताना गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…, गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…, एक दोन तीन चार… गणपतीचा जयजयकार च्या घोषणा दिल्या.आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तांचा कंठ दाटून आला.

हेही वाचले का?

Back to top button