World Sight Day: दृष्टीशी संबंधित ‘हे’ आहेत आजार | पुढारी

World Sight Day: दृष्टीशी संबंधित 'हे' आहेत आजार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत हा स्मार्टफोन वापरणा-यांचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत तिस-या क्रमांकावर आहे आणि इथे रेटिनाशी निगडित आजार असलेल्या लोकांची संख्या १ कोटीहून अधिक आहे . रेटिना अर्थात नेत्रपटलाचे आरोग्य जपण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ऑप्टोमेट्रिस्ट किंवा ऑप्थॅल्मोलॉजिस्टकडून आपल्या डोळ्यांची नियमितपणे तपासणी करून घेणे.

यामुळे आजारांना प्रतिबंध करता येतो किंवा आजार असेलच तर त्याचे वेळीच निदान होऊन वेळच्या वेळी मिळालेल्या योग्य उपचारांच्या मदतीने तो आटोक्यात ठेवता येतो आणि दृष्टीहीनता टाळता येlते. एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेश (एएमडी) आणि डायबेटिक रेटिनोथेरपी (डीआर) यांच्यावर योग्य वेळी आणि नेमके उपचार झाले नाहीत तर त्यामुळे दृष्टीची ब-यापैकी हानी होते.

मोतिबिंदूची वयोमानानुसार उद्भवणारी स्थिती : डॉ. अजय दुदानी

मुंबई रेटिना सेंटरचे सीईओ व्हिट्रिओरेटिनल सर्जन डॉ. अजय दुदानी म्हणाले, “माझ्या निरीक्षणानुसार वयाच्या साठीमध्ये असलेल्या किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींपैकी ६०% व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या मोतिबिंदूची समस्या जाणवते, ही वयोमानानुसार उद्भवणारी स्थिती आहे व त्यामुळे हळूहळू नजर कमी होत जाते. या रुग्णांपैकी ४०% रुग्णांच्या बाबतीत या आजाराचे स्वरूप अधिक तीव्र असते व त्यांतून अंधत्व येऊ शकते. पण मोतिबिंदूचे रुग्ण हा आजार अगदी पुढच्या टप्प्यावर पोहोचल्यावर आले तरीही शस्त्रक्रियेच्या माध्यमातून पूर्णपणे बरे होऊ शकतात.

दुस-या बाजूला ग्लॉकोमा आणि रेटिनाशी निगडित आजारांवर उपचार केले गेले नाहीत तर त्यातून होणारे परिणाम हे अपरिवर्तनीय असतात, ज्यामुळे अंधत्वही येऊ शकते. उदाहरणार्थ, डायबेटिक रेटिनोथेरपीवर वेळच्यावेळी आणि परिणामकारक उपचार करणे आवश्यक असते. मधुमेहासोबत जितकी अधिक वर्षे जातात, तितकाच या आजाराचा धोका वाढत जातो, २० वर्षांपासून मधुमेहाचा त्रास असलेल्या यव्क्तींमध्ये नेत्रविकार जडण्याचा धोका तब्बल ९०% इतका असतो. माझ्या रुग्णांपैकी १५ ते २० टक्‍के रुग्णांना ग्लॉकोमाची समस्याही असते, ज्यामुळे डोळ्यांची नस दुखावली जाते आणि रुग्णांनी नियमितपणे तपासून घेतले नाही आणि फॉलो-अप घेतला नाही तर हा आजार वेगाने गंभीर रुप धारण करू शकतो, असेही त्‍यांनी सांगितले.

आम्ही या आजाराविषयी आणि नेत्रतपासणी प्रक्रिया सहजतेने पारपडण्यासाठी उपलब्ध अधिकाधिक प्रगत तंत्रज्ञानाविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने काम करत आहोत. ही स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित देखरेखीबरोबरच आय ड्रॉप्स, नवनवीन औषधे, लेझर किंवा अगदी शस्त्रक्रियेसारखे उपचारांचे अनेक प्रगत पर्याय उपलब्ध आहेत. ग्लुकोमा आणि इतर नेत्रविकारांवरील उपचारांच्या अशा पर्यायांची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

अतिरिक्त स्क्रिन टाइममुळे उद्भवणा-या डोळ्यांच्या समस्या

● डोळे शुष्क होणे : तासनतास स्क्रिनकडे पाहत राहिल्यास आपल्या पापण्यांची हवी तितकी उघडझाप होत नाही. यामुळे डोळ्यांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करणारा अश्रूंचा पडदा उघडा पडतो आणि त्यामुळे डोळे कोरडे होतात व त्यांना खाज येते.

● डोळ्यांना थकवा येणे : ॲस्थेनोपिया, ऑक्युलर फटीग किंवा आय फटीग म्हणजे अतिवापरामुळे डोळ्यांना थकवा येणे. दीर्घकाळासाठी कम्प्युटर स्क्रीनकडे किंवा स्मार्टफोनकडे पाहत राहिल्यामुळे सर्रास जाणवणारा हा त्रास आहे व डोळ्यांना विश्रांती दिल्यास तो दूर होऊ शकतो.

● एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी) :  एएमडीचा केंद्रीय दृष्टीवर परिणाम होतो आणि वयोवृद्ध व्यक्तींमध्ये ही समस्या सर्रास आढळून येते. स्क्रीनमधून निघणा-या निळ्या प्रकाशाचा खूप जास्त संपर्क आल्याने रेटिनाला दुखापत होते व त्यातून एएमडी उद्भवू शकतो व यामुळे कालांतराने अंधत्व येते. मात्र एएमडीचे निदान वेळीच झाल्यास तुम्हाला या आजारावर परिणामकारक उपचार मिळू शकतात आणि दृष्टी गमावण्याच्या प्रतिबंध करता येण्याजोग्या परिणामांना टाळता येते.

● दूरची दृष्टी धूसर होणे :  मायोपिया किंवा नियर साइटेडनेस ही एक सर्वसामान्य समस्या आहे, ज्यात दूरवरच्या गोष्टी नीट दिसत नाहीत, किंवा धूसर दिसतात, तर जवळच्या गोष्टी स्पष्ट दिसतात. सतत घरातच राहणे आणि स्क्रीनकडे प्रदीर्घ काळासाठी बघत राहणे यामुळे तुमची नजर हातभर अंतराहूनही जवळ असलेल्या वस्तूवरच खिळून राहते, त्यामुळे नियर सायटेडनेस ही समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते. डोळ्यांची शुष्कता, लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे आणि डोळ्यांशी निगडित इतर समस्या या खूप वेळ स्क्रीनकडे पाहत राहिल्याने जडतात. डोळ्यांच्या स्नायूंना अतिरिक्त ताण दिल्याची ती परिणिती असते. आपल्या डोळ्यांचे निरोगीपण जपण्यासाठी काही उपाय

डाेळे निराेगी ठेवण्‍यासाठी खालील टीप्‍स फाॅलाे करा

• पापण्यांची उघडझाप करत राहिल्यास व हायड्रेटिंग आय ड्रॉप्सचा वापर केल्याने डोळ्यांच्या शुष्कतेची समस्या दूर होऊ शकते.

• उजेडामुळे स्क्रीन चकाकू नये यासाठी खोलीतील प्रकाशयोजनेत योग्य ते बदल करा व कम्प्युटरची स्क्रीन स्वत:पासून हातभर लांब असेल याची काळजी घ्या.

• स्क्रीनवरील मजकुराचा आकार मोठा करा म्हणजे डोळ्यांवर ताण येणार नाही. तसेच दर ३०-४० मिनिटांनी विश्रांती घ्या. यावर्षी १३ ऑक्टोबर रोजी जागतिक दृष्टीदीन साजरा होणार असून, डोळ्यांच्या आरोग्याच्या महत्त्वाविषयी लोकांमध्ये जागरुकता वाढविणे, डोळ्यांचे आरोग्य जपण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हे या दिवसाचे लक्ष्य आहे.

  • योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, नियमितपणे डोळे तपासून घेणे आणि वेळच्यावेळी औषधोपचार घेणे या गोष्टींची मदत होऊ शकेल. तेव्हा आपण कितीवेळ स्क्रीनसमोर घालवतो याची नोंद ठेवायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले डोळे व शरीर निरोगी ठेवण्यासाठी आरोग्यपूर्ण व सक्रिय जीवनशैलीचा अंगिकार करा.

 

Back to top button