चीनच्या नाकावर टिच्चून लडाखमध्ये भारतीय जवानांनी सिंधूवर उभारला पूल | पुढारी

चीनच्या नाकावर टिच्चून लडाखमध्ये भारतीय जवानांनी सिंधूवर उभारला पूल

लेह (लडाख); वृत्तसंस्था : चीनने पँगाँग सरोवरावर पुलाची उभारणी करून भारताला आव्हान दिले होते. चीनला जशास तसे उत्तर म्हणून भारतीय लष्कराने बघता बघता सिंधू नदीवर पुलाची उभारणी करून दाखविली आहे. लष्कराच्या नैर्ऋत्य कमांडने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून, यात भारतीय जवान मोठ्या जिद्दीने सिंधू नदीवर पूल उभारताना दिसत आहेत.

पूर्व लडाखमध्ये सप्त शक्ती इंजिनिअर्स दळणवळणाशी संबंधित कामात व्यग्र आहेत. नवीन आव्हानांना सामोरे जाण्याचे प्रशिक्षणही घेत आहेत. या चमूने सिंधू नदीवर पुलाची उभारणी केल्याने लष्करी कार्यवाहीत सुलभता येणार आहे. लष्करी सामग्री पलीकडे पोहोचविणे आणि चीनला वेळेत प्रत्युत्तर देणेही शक्य होणार आहे, असे लष्करातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

पोलादाच्या वजनी भागात पाणी ओतताना जवान या व्हिडीओत दिसत आहेत. पोलादाच्या या वेगवेगळ्या भागांनी मिळून नंतर पूल तयार झालेला दिसतो आहे. पुलावरून लष्करी वाहने जातानाही शेवटी दिसतात. दुर्गम भागात असा पूल बनविणे हे मोठे आव्हान होते. ते जवानांनी पेलले आहे. भारतीय लष्करप्रमुख मनोज पांडे हे नुकतेच लडाखमध्ये दोन दिवसांच्या दौर्‍यावर होते. त्यांनी या भागातील भारतीय बाजूच्या लष्करी हालचालींचा आढावा घेतला होता. अपाचे हेलिकॉप्टरमधून स्वत: या भागातील टेहळणी केली होती. ‘ग्राऊंड लेव्हल’ला चाललेल्या व करावयाच्या कामांबद्दलही त्यांनी जाणून घेतले होते, हे येथे उल्लेखनीय!

Back to top button