दहशतवादी संघटना भारतात घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नात; सुरक्षा यंत्रणांकडून १५ दिवसांत १० अलर्ट जारी | पुढारी

दहशतवादी संघटना भारतात घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नात; सुरक्षा यंत्रणांकडून १५ दिवसांत १० अलर्ट जारी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद तसेच तालिबान्यांमध्ये कंदाहार येथे झालेल्या बैठकीमुळे भारतात मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत दहशतवादी संघटना असल्याचे समोर आले आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या बैठकीची चर्चा पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात देखील रंगली आहे. अशात पाकिस्तानातील दहशतवादी काश्मीर खोऱ्यात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे.

यासंबंधी आतापर्यंत तब्बल १० अलर्ट जारी केले आहेत. घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवादी तालिबानची मदत घेवू शकते, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे तालिबान ने १५ ऑगस्ट ला काबूलवर ताबा मिळवला होता. तेव्हापासून ‘काश्मीर मिशन’मध्ये तालिबान सोबत असल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जात आहे.

गुप्तचर यंत्रणेच्या एका अलर्टनूसार ५ दहशतवाद्यांचा एक गट पाकव्याप्त काश्मीरच्या जांडरोड मार्गे पुंछ मेंढर परिसरात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. हे सर्व दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे आहेत. गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यानुसार समाज माध्यमांवरही दहशतवाद्यांची सक्रियता वाढली आहे. समाज माध्यमांवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओत कश्मीर खोऱ्यातील युवकांना लक्ष केले जात आहे. अशाप्रकारच्या व्हिडिओवरही सुरक्षा यंत्रणांचे लक्ष असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

दहशतवाद्यांच्या ठिकाणांमध्ये बदल

गुप्तचर यंत्रणांना लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद तसेच हिजबुल मुजाहिद्दीनच्या दशतवाद्यांच्या ठिकाण्यांमध्ये बदल दिसून आले आहेत. सुरक्षा यंत्रणांना ग्रेनेड हल्ला, हाय व्हॅल्यू टार्गेट अर्थात महत्वांच्या ठिकाणांवर हल्ले, सुरक्षा दलांवर हल्ले तसेच सार्वजनिक महत्वपूर्ण ठिकाणांवर आयईडी ब्लास्ट दहशतवादी घडवून आणू शकतात यासंबंधी सतर्क करण्यात आले आहे.

पाकव्याप्त काश्मिरात हालचालींना वेग

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तालिबानने काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हालचालींना वेग आला आहे. पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी सीमा ओलांडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसघोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

गेल्या १५ दिवसांच्या आता गुप्तचर यंत्रणांनी जवळपास १० अलर्ट जारी केले आहेत. सीमेवर मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांसंबंधी हे अलर्ट जारी करण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट मिळताच सुरक्षा यंत्रणेला सतर्क करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

हे ही वाचलत का :

ओंकारेश्वर : एक अद्भुत ज्योतिर्लिंग

Back to top button