इंदापूर ; पुढारी वृत्तसेवा : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज भाजपवर हल्लाबाेल केला. पाच वर्षांत भाजपच्या अनेक मंत्र्यांवर आरोप झाले मात्र कोणाचीही 'ईडी' किंवा सीबीआयकडून चौकशी झालेली नाही, भाजपच्या एकाही नेत्यावरती ईडी किंवा सीबीआय कारवाई करत नाही. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे राजकारण केव्हाही नव्हते, मात्र बदला घेण्यासाठी भाजपचे सूडाचे राजकारण सुरू आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. ते इंदापूरमध्ये आयाेजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
विमुक्त दिनानिमित्त ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समन्वय समिती, सोलापूर यांच्या वतीने आज (मंगळवार) सोलापुरात गंगा लॉन्स, टाकळीकर मंगल कार्यालय, जुळे सोलापूर येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्यासाठी मंत्री विजय वडेवट्टीवार निघाले असता ते इंदापूरमध्ये थांबले होते. यावेळी राम वडकुते उपस्थित होते. इंदापूर काँग्रेस कमिटी कडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत,कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, शहराध्यक्ष चमनभाई बागवान,जिल्हा सरचिटणीस जकिरभाई काझी, किसान सेलचे तालुकाध्यक्ष डॉ संतोष होगले, ॲड राहुल मखरे, प्रा.कृष्णा ताटे, भगवान फासगे, संतोष आरडे, तुषार चिंचकर, सागर आवटे, भागवत गटकुळ, निवास शेळके, महादेव लोंढे, श्रीनिवास पाटील, आकाश पवार, युवराज गायकवाड, विपुल भिलारे, राहुल जाधव, राहुल वीर, रमेश शिंदे, भगवान कोळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, सत्ता गेल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा फार विचलित झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्तेत पुन्हा येण्यासाठी ई.डी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स याचा गैरवापर सध्या केला जातोय.
या दबाव तंत्राचा उपयोग करून पुन्हा सत्ता कशी मिळवता येईल हा त्यांचा उद्देश आहे. तर महाविकास आघाडी सरकारला या सर्वाचा वापर करून बदनाम कसे करता येईल हा त्या पाठीमागे दुसरा उद्देश आहे.
भविष्यासाठी हे सर्वांसाठीच घातक आहे. कारण सत्तेचा मुकुट कोणीही आयुष्यासाठी घालून येत नाही.
सत्ता येत असते सत्ता जात असते. मात्र, ज्या पद्धतीने आज तुम्ही वागत आहात.
त्याच पद्धतीने उद्या तुमच्याशी दुसरे लोक वागतील.
सत्तेचा उपयोग हा लोकांना न्याय देण्यासाठी केला पाहिजे.
मात्र विरोधी बाकावर बसलेली भाजप खुर्चीसाठी भांडते हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही मंत्री वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचलं का ?