सहकारी बँक ग्राहकांची खाती आता ‘डीबीटी’ने जोडली जाणार | पुढारी

सहकारी बँक ग्राहकांची खाती आता ‘डीबीटी’ने जोडली जाणार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सहकारी बँकांच्या ग्राहकांना मिळावा म्हणून त्यांची खाती ‘डीबीटी’द्वारे (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) जोडली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे एका कार्यक्रमात बोलताना केली. सहकारी बँकिंग क्षेत्राच्या विकासाच्या द‍ृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

केंद्र सरकारच्या 52 मंत्रालयांकडून चालवल्या जाणार्‍या सुमारे 300 योजनांचा लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविला जात आहे. आता या सर्व योजनांचा लाभ सहकारी बँकांच्या ग्राहकांनादेखील मिळणार आहे, असे शहा यांनी सांगितले. आधीच्या तुलनेत बँकिंग क्षेत्रात खूप सुधारणा झाल्या असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, जनधन योजनेमुळे 45 कोटी लोकांची बँक खाती गेल्या काही वर्षांत उघडली गेली आहेत. शिवाय 32 कोटी लोकांना रूपे डेबिट कार्डचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला आहे. सहकारातून समृद्धीचा वसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यामुळे हे शक्य झाले आहे.

देशाच्या समृद्धी आणि आर्थिक उन्नतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान राहिलेले आहे, असे सांगत शहा म्हणाले की, जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या नवीन खात्यांचे डिजिटल व्यवहार कोट्यवधी रुपयांच्या पुढे गेलेले आहेत. सहकारी बँकांना डीबीटीसोबत जोडल्यामुळे नागरिकांशी संपर्क वाढेल आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट होईल. तसेच नागरिकांना सावकारांच्या तावडीतून वाचवण्यात मदत होईल. याआधी बँकांकडून 12 ते 15 टक्के व्याजाने कर्ज मिळत होते, ते आता 10 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. कर्जाची परतफेड करणार्‍या लाभार्थ्यांना दोन टक्के सवलतही दिली जात आहे.

Back to top button