द्रौपदी मुर्मू : शिक्षिका ते राष्ट्रपती… आव्हानात्मक जीवनप्रवास | पुढारी

द्रौपदी मुर्मू : शिक्षिका ते राष्ट्रपती... आव्हानात्मक जीवनप्रवास

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ओडिशा या एका आदिवासीबहुल राज्याच्या नागरिक असलेल्या द्रौपदी मुर्मू आता देशाच्या १५ व्या नामनियुक्त राष्ट्रपती बनल्या आहेत. त्यांचा संपूर्ण राजकीय आणि वैयक्तिक जीवनप्रवास म्हणजे अविरत संघर्षाची कहाणी होय. आपली निवड या सर्वोच्च पदासाठी होईल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. त्यामुळेच जेव्हा एनडीएने त्यांना राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार म्हणून निवडले तेव्हा क्षणभर त्यांचा यावर विश्वासच बसला नव्हता.

मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावातील एका आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही गावचे सरपंच होते. त्यामुळे त्यांना राजकीय बाळकडू घरातूनच मिळाले. भुवनेश्वर येथील रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. नंतर 1979 ते 1983 या काळात त्यांनी वीज खात्यात कारकून म्हणून नोकरी केली. त्यानंतर त्यांनी अध्यापक म्हणून सेवा बजावली, तीसुद्धा मुलीच्या आग्रहाखातर. मग यथावकाश त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

नगरसेविका, आमदार, राज्य सरकारमधील मंत्री व राज्यपाल अशा राजकीय पदांवर त्यांनी काम केले आहे. त्या 1997 मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पाठोपाठ 2000-2004 आणि 2004-2009 मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या. याखेरीज त्यांनी भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदही भूषवले आहे.

सामाजिक प्रश्नांना प्राधान्य

द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यानंतर सामाजिक प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी बालपणापासून सोसलेले गरिबीचे चटके. 2016 मध्ये रांचीतील कश्यप मेडिकल कॉलेजद्वारा आयोजित केलेल्या ‘रन ऑफ व्हिजन’ कार्यक्रमात त्यांनी नेत्रदानाची घोषणा केली होता. वास्तविक त्यांना लहानपणापासून गरिबीचा सामना करावा लागला तरी त्यांनी याचा कधीच उल्लेख केला नाही.

दुःखाचा डोंगर तरीही…

द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनात 2010 ते 2011 हा कालखंड म्हणजे साक्षात कालपर्व ठरला. या कालावधीत त्यांच्या लक्ष्मण नावाच्या थोरल्या मुलाचा गूढरीत्या मृत्यू झाला. धाकटा मुलगा बिरंची हा एका रस्ता अपघातात ठार झाला. पाठोपाठ 1 ऑक्टोबर 2014 रोजी त्यांचे पती श्यामचरण यांनाही देवाज्ञा झाली. त्यापूर्वी म्हणजे 1984 साली त्यांची तीन वर्षांची गोजिरवाणी कन्या अचानकपणे मरण पावली होती. एकापाठोपाठ बसलेल्या या धक्क्यांमुळे द्रौपदी मुर्मू निराशेच्या गर्तेत ढकलल्या गेल्या. मात्र, नंतर हळूहळू त्या यातून सावरल्या आणि नव्या जोमाने काम करू लागल्या.

पहिल्या आदिवासी राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू भारताच्या पहिल्या आदिवासी आणि दुसर्‍या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. यापूर्वी प्रतिभा देवीसिंह पाटील या एकमेव महिला राष्ट्रपती राहिलेल्या आहेत. यापूर्वी कधीही राष्ट्रपतिपदी अनुसूचित जमातीची स्त्री किंवा पुरुष कार्यरत झालेला नाही. अर्थात, अनुसूचित जातीचे दोन राष्ट्रपती झाले असून, त्यांची नावे आहेत के. आर. नारायणन आणि विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद.

1 गाय, बैल आणि 16 जोडी कपडे

द्रौपदी मुर्मू यांनी श्यामचरण मुर्मू यांच्याशी लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुले (दोघेही मरण पावले) आणि एक मुलगी झाली. त्यांच्या पतीचे देखील निधन झाले आहे. आता त्यांच्या कुटुंबात मुलगी इतिश्री, नातू आणि जावई आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यावेळी द्रौपदी यांच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे बैदापोसी गावात श्यामचरण यांना तब्बल तीन दिवस डेरा टाकावा लागला होता. द्रौपदी या संथाल समाजाच्या आहेत. श्यामही त्याच समाजाचे होते. या समाजात मुलीच्या कुटुंबाला मुलाला हुंडा द्यावा लागतो. दोन्ही घरची मंडळी एकत्र बसून हुंडा किती व काय द्यावा हे ठरवतात. त्यावेळी चर्चेत असे ठरले की, हुंड्यात एक गाय, बैल आणि 16 जोडी कपडे वर पक्षाने वधू पक्षाला द्यायचे. त्याला श्यामचरण यांनी लगेच होकार दिला आणि नंतर म्हणजे 1980 मध्ये दोघांचा विवाह झाला.

सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी 25 जुलै रोजी होईल. ज्या दिवशी त्या शपथ घेतील, त्या दिवशी त्यांचे वय 64 वर्षे 35 दिवस असेल. त्यामुळे त्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती बनतील. आतापर्यंत सर्वात कमी वयाचे राष्ट्रपती होण्याचा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर आहे. ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचे वय होते 64 वर्षे दोन महिने आणि 6 दिवस.

भूषविलेली महत्त्वाची पदे

* द्रौपदी मुर्मू यांनी 18 मे 2015 ते 2021 पर्यंत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम केले असून, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल ठरल्या आहेत.
* 2007 मध्ये ओडिशा विधानसभेकडून सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ पुरस्काराने गौरव.
* ओडिशा सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) : (6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2004)
* ओडिशा सरकारमध्ये मत्स्य व्यवसाय आणि पशु संसाधन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) : (6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004)
* ओडिशा विधानसभेच्या आमदार (2000 ते 2009)

Back to top button