राष्ट्रपती निवडणूक : द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित, देशाला मिळणार पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती | पुढारी

राष्ट्रपती निवडणूक : द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित, देशाला मिळणार पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी अतिशय उत्साहात मतदान झाले होते. देशाची राजधानी दिल्लीमध्ये संसदेच्या उभय सदनातील खासदारांनी तर विविध राज्यांच्या राजधान्यांमध्ये विधानसभेच्या सदस्यांनी मतदान केले होते. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात ही निवडणूक होत आहे. आज गुरुवारी जाहीर होणाऱ्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी ११ वाजता मतमोजणी सुरू होऊन दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या २४ तारखेला संपत आहे. या पार्श्वभूमीवर निवडून येणारे नवे राष्ट्रपती २५ तारखेला पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. विरोधी आघाडीतील अनेक पक्षांनी तसेच कोणत्याही आघाडीत सामील नसलेल्या बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस या पक्षांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीत किमान ६० टक्के मते मुर्मू यांना पडतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. खासदार आणि आमदार असे मिळून ४८०० लोकप्रतिनिधी या मतदानासाठी पात्र होते.

विरोधी गोटाकडून मोठ्या प्रमाणात क्रॉसवोटिंग

विरोधी गोटाचे अनेक खासदार आणि आमदारांनी क्रॉस वोटिंग करुन द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले आहे. क्रॉस वोटिंग केलेले बहुतांश लोकप्रतिनिधी काँग्रेस, सपा, तृणमूल, राष्ट्रवादी या पक्षांचे आहेत. आसाममध्ये तर कॉंग्रेसच्या वीस आमदारांनी क्रॉस वोटिंग करीत मुर्मू यांच्या बाजुने मतदान केल्याचा आरोप एआययुडीएफने केला आहे. ओडिशामध्ये काँग्रेसचे आमदार मो. मोकीम यांनी, गुजरातमध्ये राष्ट्रवादीचे कांधल जडेजा यांनी तसेच उत्तर प्रदेशात सपाचे शहजील इस्लाम यांनी मुर्मू यांना मतदान केले. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणात मुर्मू यांना मतदान केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. हरियानातील काँग्रेसचे आमदार कुलदीप बिष्णोई यांनी राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला मत दिले होते. राष्ट्रपती निवडणुकीतही त्यांनी भाजपप्रणित रालोआ उमेदवाराला मत दिले.

विरोधी गोटाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा हे भाजपचे हजारीबाग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. जयंत सिन्हा यांनी आपल्या पित्याऐवजी द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती.

 हे ही वाचा :

Back to top button