पश्चिम बंगालमध्ये देशी दारू प्यायल्याने ७ जणांचा मृत्यू | पुढारी

पश्चिम बंगालमध्ये देशी दारू प्यायल्याने ७ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील हावडा येथे देशी दारू प्यायल्याने ७ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ७ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल, असे हावडा पोलीस आयुक्त प्रवीणकुमार त्रिपाठी यांनी सांगितले.

हावडा जिल्ह्यातील हूच डेन गावातील मालीपंचघोरा परिसरात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. रात्री देशी दारूचे सेवन केल्यानंतर अनेक जणांना त्रास होऊ लागला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सात जणांचा आज (दि.२०) सकाळी मृत्यू झाला. तर इतर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसले, तरी पोलिसांनी दारू दुकानाचे मालक प्रताप कर्माकर याला अटक केली आहे.

मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी आम्ही पोस्टमार्टम तपासणी अहवालाची वाट पाहत आहोत. आम्ही दुकानाच्या मालकाला अटक केली आहे आणि तेथून रासायनिक तपासणीसाठी अल्कोहोलचे नमुने पाठवले आहेत, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, प्रशासनाने दारूचे दुकान सील केले आहे. सात जणांच्या मृत्यूनंतर परिसरात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महिलांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button