शिंदे समर्थक १२ खासदारांचा गट लोकसभेत अधिकृत, राहुल शेवाळेंच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब | पुढारी

शिंदे समर्थक १२ खासदारांचा गट लोकसभेत अधिकृत, राहुल शेवाळेंच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेच्या १२ बंडखोर खासदारांनी लोकसभेत स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यानंतर राहुल शेवाळे यांना शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी मान्यता दिली होती. दरम्यान, लोकसभेतील शिवसेनेचा गटनेता बदलला असल्याची अधिसूचना लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेच्या लोकसभेतील नेतेपदी राहुल शेवाळे यांचे नाव लागले आहे.

शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ लोकसभेतील खासदारांनी देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड पुकारल्याने आता लोकसभेच्या संसदीय पक्षातही उभी फूट पडली आहे. शिंदे गटाला अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर या गटाने लोकसभेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेचे १२ खासदार मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले. या १२ जणांनी स्वतंत्र गटाची स्थापना स्थापना करीत लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची, तर प्रतोदपदी भावना गवळी यांची निवड केली. या गटास लोकसभेत शिवसेनेचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यावी, असे पत्र त्यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले. त्यानंतर शेवाळे यांना शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली होती.

शिवसेनेच्या १२ बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आले आहे. त्यात शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात शिंदे यांच्या गटाने म्हटले आहे की, शिवसेनेच्या बहुसंख्य नेत्यांनी एकत्र येऊन नवीन कार्यकारिणी स्थापन केली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या गटाने आधीच निवडणूक आयोगासमोर एक कॅव्हेट दाखल केले आहे. ज्यात कोणत्याही पक्षाने सेनेच्या संदर्भात कोणतीही याचिका दाखल केली असल्यास त्यावर सुनावणी घेण्यास सांगितले आहे. सुनावणीआधीच कोणताही आदेश किंवा निर्णय देऊ नका, अशी विनंती ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

 हे ही वाचा :

Back to top button