राष्ट्रपतींची निवड एकदाच झाली होती बिनविरोध | पुढारी

राष्ट्रपतींची निवड एकदाच झाली होती बिनविरोध

नवी दिल्ली; पीटीआय : देशाचे सातवे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वोच्च पदासाठी बिनविरोध निवडले गेलेले एकमेव राष्ट्रपती होते. 1977 मध्ये फकरुद्दीन अली अहमद यांच्या निधनानंतर त्यांना हा मान मिळाला होता. अहमद यांचे निधन 11 फेब्रुवारी 1977 रोजी झाले. त्याच्या एक दिवस आधी आणीबाणीच्या दोन वर्षांनंतर लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांनी कार्यवाहक राष्ट्रपतिपद सांभाळले होते. त्यावर्षी जून-जुलैला 11 राज्यांत विधानसभा निवडणुका होणार होत्या आणि राष्ट्रपती निवडणुकीची अधिसूचना 4 जुलैलाच काढण्यात आली.

दरम्यान, लोकसभेचे नव्याने निवडून आलेले 524 सदस्य, राज्यसभेचे 232 सदस्य आणि 22 विधानसभांचे आमदार राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करू शकले नाहीत. कारण रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात एकमेव उमेदवार होते. अन्य 36 उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. ही निवडणूक असामान्य परिस्थितीत झाली असली, तरी राष्ट्रपतिपदाची सर्वाधिक रोमांचक निवडणूक 1969 मध्ये झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रेड्डी यांनी व्ही. व्ही. गिरी यांना पराभूत केले होते.

1952 मध्ये पहिल्या राष्ट्रपती निवडणुकीत पाच उमेदवार होते. यामध्ये सर्वात शेवटच्या स्थानी राहिलेल्या उमेदवाराला केवळ 533 मते मिळाली होती. या निवडणुकीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी विजय मिळविला होता. 1957 मध्ये दुसर्‍या निवडणुकीत तीन उमेदवार होते आणि ही निवडणूकही प्रसाद यांनी जिंकली होती. तिसर्‍या राष्ट्रपती निवडणुकीत 3 उमेदवार होते. 1967 मधील चौथ्या निवडणुकीत 17 उमेदवार होते. यातील 9 जणांना एकही मत मिळाले नव्हते आणि पाच उमेदवारांना 1 हजारपेक्षा कमी मते मिळाली होती. या निवडणुकीत झाकीर हुसैन यांना 4.7 लाखांहून अधिक मते मिळाली होती.

पाचव्या निवडणुकीत 15 उमेदवारांमध्ये लढत झाली होती. त्यातील पाच जणांना एकही मत मिळाले नाही. 1969 मधील निवडणुकीत अनेक प्रयोग पहिल्यांदा झाले होते. ज्यामध्ये मतदान सक्तीपासून गोपनीयता राखणे आणि काही आमदारांना आपल्या राज्यांच्या राजधान्यांऐवजी नवी दिल्लीत संसद भवनात मतदानाची परवानगी देणे याचा समावेश होता. 1974 च्या सहाव्या निवडणुकीत केवळ दोन उमेदवार होते. तर 1977 मधील सातव्या निवडणुकीत एकूण 37 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. निवडणूक निर्णय अधिकार्‍याने छाननीनंतर 36 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले होते आणि केवळ एक उमेदवार रेड्डी बिनविरोध निवडून आले होते.

1982 मध्ये झालेल्या आठव्या राष्ट्रपती निवडणुकीत दोन उमेदवार होते, तर 1987 मधील नवव्या निवडणुकीत 3 उमेदवार नशीब आजमावत होते. या निवडणुकीतील एक उमेदवार मिथिलेश कुमार सिन्हा यांनी आकाशवाणी/दूरदर्शनवरून आपले विचार मांडण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली. त्यानंतर 1992 मध्ये 10 व्या राष्ट्रपती निवडणुकीत 4, तर 1997 मधील 11 व्या निवडणुकीत केवळ दोन उमेदवार होते. या निवडणुकीत सुरक्षा रक्कम, अनुमोदक आणि समर्थकांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली होती.

Back to top button