‘सेंट्रल विस्टा, पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानाच्या खर्चात १३ एम्स बनतील’ | पुढारी

‘सेंट्रल विस्टा, पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानाच्या खर्चात १३ एम्स बनतील’

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

नवीन संसद भवन ज्या प्रकल्पाअंतर्गत उभारली जात आहे, तो सेंट्रल विस्टा प्रकल्प तसेच पंतप्रधानांचे नवे निवासस्थान मिळून हिशेब केला तर तितक्याच पैशात 12 हजार बेडची 13 एम्स रुग्णालये देशात उभी राहतील, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वढेरा यांनी सोमवारी केंद्र सरकारवर टीका केली. 

कोरोनाचे संकट गंभीर असूनही केंद्र सरकारने सेंट्रल विस्टा प्रकल्प पुढे रेटला आहे. यावरून काँग्रेसने गेल्या काही दिवसापासून सरकारला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. सेंट्रल विस्टा प्रकल्प आणि पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानासाठी 20 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याच पैशात कोरोनावरील 62 हजार लसींचा पुरवठा करता येईल. 22 कोटी रेमडेसिवीरची इंजेक्शन खरेदी करता येतील. 3 कोटी 10 लाख लीटर ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना करता येईल. किंवा 12 हजार बेडची क्षमता असलेली 13 एम्स रुग्णालये स्थापन करता येतील, असे प्रियांका गांधी-वढेरा यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

Back to top button