कोरोनामुक्तांना ६ महिन्यांनी लस द्यावी | पुढारी

कोरोनामुक्तांना ६ महिन्यांनी लस द्यावी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

केंद्र सरकारने लसीकरणासाठी स्थापन केलेल्या नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुपने (एनटीएजीआय) कोरोना लसीसंदर्भात विविध शिफारशी केल्या आहेत. कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवावे तसेच कोरोनाबाधितांना ते कोरोनामुक्त झाल्यानंतर 6 महिन्यांनी कोरोना लस देण्यात यावी, अशी महत्वाची सूचना एनटीएजीआयने केली आहे. 

गर्भवतींंना कोणतीही कोरोना लस घेण्याचा पर्याय उपलब्ध करवून दिला जाऊ शकतो आणि प्रसूतीनंतर कोणत्याही वेळी स्तनपान करणार्‍या महिलांना लस दिली जाऊ शकते, असेही समितीने स्पष्ट केले आहे. कोरोनाबाधितांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत कोरोना लसीकरण टाळावे, असेही एनटीएजीआयने सांगिले आहे.

एनटीएजीआयच्या शिफारसी या कोरोनासंबंधी राष्ट्रीय तज्ज्ञ गटाकडे पाठवण्यात येतील. त्यांनी या शिफारसीसंबंधी विचारविमर्श केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनटीएजीआयने कोरोना लस कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केली आहे. सध्यस्थितीत कोव्हिशील्ड च्या दोन डोसमधील अंतर हे 4 ते 8 आठवड्यांदरम्यानचे आहे. 

दरम्यान, सरकारच्या समितीने केलेल्या शिफारशींना लसींच्या तुटवड्यांसंबंधी देखील जोडले जात आहे. लसींभावी महाराष्ट्र, दिल्ली सह अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून लसीकरणावर प्रभाव पडला आहे. 

लसींचा तुटवाड लक्षात घेता समितीने कोव्हिशील्डच्या दोन डोज दरम्यानचे अंतर वाढवण्याची शिफारस केल्याचेही बोलले जात आहे.सध्या लसीकरणाच्या नियमानुसार आतापर्यंतच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये गर्भवती तसेच स्तनदा महिलांचा समावेश करण्यात आलेला नाही. अशात त्यांना लसीकरण करण्यात येत नाही.  कोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनासंसर्ग झालेल्यांना कोरोनामुक्त झाल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी चार ते आठ आठवड्यांचा काळ निश्चित करण्यात आला आहे. 

Back to top button