कोरोना : पहिला डोस देण्यात भारतानं अमेरिकेला टाकलं मागे | पुढारी

कोरोना : पहिला डोस देण्यात भारतानं अमेरिकेला टाकलं मागे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोनावरील पहिला डोस देण्याच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे.  आतापर्यंत देशात 17.2 कोटी लोकांना पहिला डोस देण्यात आला असल्याची माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी शनिवारी दिली. लसीकरणाचे संपूर्ण उद्दिष्ट साध्य होण्यासाठी काही कालावधी जाणे आवश्यक असल्याची टिप्पणीही पॉल यांनी केली. 

कोरोनाची दुसरी लाट कमी होत आहे, अशा स्थितीत लोकांनी जर गेल्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यासारखी बेफिकिरी दाखविली तर पुन्हा कोरोना डोके वर काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पॉल यांनी या वेळी दिला. दुसरी लाट कमी झाल्याचा लाभ घेत आपण जास्तीत जास्त लसीकरण करावयास हवे, असेही ते म्‍हणाले. 

देशात दररोज तयार होते 146 टन बायोमेडिकल वेस्टेज…

दरम्यान देशात दररोज 146 टन बायोमेडिकल वेस्टेज (जैववैद्‍यकीय कचरा) तयार होते, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली आहे. बायोमेडिकल वेस्टेज हा चिंतेचा विषय बनला असून कोरोना संकटकाळात यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्लास्टिक कचऱ्याचा पर्यावरणावर घातक परिणाम होत आहे. कोरोना चाचणी व बाधितांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यात प्लास्टिक व्यापक प्रमाणात आहे. गेल्या वर्षभरात कोविड-19 मुळे 45 हजार 308 टन बायोमेडिकल वेस्टेज तयार झाले असल्याचेही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सांगण्यात आले. 

Back to top button