‘स्पर्म व्हेल’ माशाची उलटी चक्क १ कोटी प्रतिकिलो दराने का विकली जाते? | पुढारी

'स्पर्म व्हेल' माशाची उलटी चक्क १ कोटी प्रतिकिलो दराने का विकली जाते?

पुढारी ऑनलाईन डेस्क : एखाद्या माशाची उलटी ही कोट्यवधी रुपयांना विकली जाते, विश्वास बसला नाही ना? पण, हे खरं आहे. कारण, समुद्रात एक मासा असाही आहे त्याने उलटी केली की, ती पाण्यात तरंगते. कारण ती तेलकट असते. तरंगणारी उलटी आपण जमा केली जाते आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला एक कोटी रुपये दराने भाव मिळतो. काय नाव आहे या माशाचं? तो उलटी कधी करतो? ती कशी जमा करतात? ती विकत घेऊन केलं काय जातं? त्याला विकत घेणारे लोक कोण आहेत? आणि आताच हा माशाच्या उलटीचं मुद्दा का समोर आला? अशी अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाली असतील, चला तर वाचूया सविस्तर… काय आहे हे प्रकरण? 

नेमका मासा कोणता?

 या माशाचं नाव आहे स्पर्म व्हेल! समुद्राच्या खोल तळाशी तो  राहतो. समुद्री प्राणी, कॅटलफीश आणि ऑक्टोपस हे खात राहतो. ज्यावेळी असे समुद्री प्राणी तो खात असतो, तेव्हा त्या भक्षकांना पचविण्यासाठी स्पर्म व्हेलच्या पोटात विशिष्ट द्रव तयार होतं. त्याला एम्बेग्रेस असंही म्हणतात. त्याच्या पोटातील भक्षकांची हाडे, दात आणि इतर टोकदार अवयव त्याच्या पोटाला इजा करू नयेत म्हणून हे द्रवच नैसर्गिकपणे तयार होतं. हे द्रव जेवढं गरजेचं आहे, तेवढं तो वापरतो आणि उरलेलं द्रव उलटीच्या माध्यमातून बाहेर काढतो. 

आता याबाबतही संशोधकांच्यामध्ये मतभेद पाहायला मिळतात. कोणी म्हणतं हे एम्बेग्रेस त्याच्या विष्ठेतून बाहेर पडतं, तर कोणी म्हणतं त्याच्या स्पर्ममधूनही बाहेर पडतं. त्यामुळेच त्याला स्पर्म व्हेल असंही म्हणतात. त्याच्या विष्ठेतून भक्ष्याचे टोकदार दातंदेखील बाहेर येत असतात. ही उलटी बाहेर पडल्यानंतर पाण्यात मिसळत नाही. कारण, ती तेलकट असतं. ती समुद्राच्या पाण्यात तरंगत राहते. त्यावर सूर्यकिरणं आणि समुद्राचं खारट पाणी याच्यामुळे त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया होते. नंतर त्या उलटीचं रुपांतर एम्बेग्रेसमध्ये होतं. 

एम्बेग्रेस काळा, पांढरा आणि फिकट रंगाचादेखील असतो. साधारणपणे अंडाकार किंवा गोलाकार असतो. विशेष म्‍हणजे  हा पदार्थ ज्वलनशील आहे. त्याचा वापर करायचा असेल तर अल्कोहोलची गरज असते. ध्वनीलहरींनुसार एम्बेग्रेस काम करतं, त्यामुळे स्पर्म व्हेल समुद्रात खाली-वर ये-जा करु शकतो. 

त्याची उलटी इतकी महाग का?

एम्बेग्रेसचा सुगंध चांगला असतो. हवेशी संपर्क आला की, त्याचा सुवास अधिक वाढतो. एम्बेग्रेस हा उंची अत्तरं किंवा परफ्युमचा सुगंध हवेत उडू नये, यासाठी महत्वाचं काम करतो. त्यामुळेच तो दुर्मिळ आहे. त्याचीही किंमतही जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एब्मेग्रेसला एक ते दीड कोटींपर्यंत प्रतिकिलो असा दर मिळतो. म्हणूनच त्याला पाण्यात तरंगणारं सोनं असंही म्हंटलं जातं. 

एम्बेग्रेसचा वापर परफ्युमसाठी केलाच जातो. त्याचबरोबर त्याचा औषधांमध्येही वापर हाेतो. ‘युनानी’ औषधांमध्ये त्याचा वापर खूप वर्षांपासून केला जातो. एम्बेग्रेससोबत वनस्पतींचा वापर करून काही औषधं तयार केली जातात. ती औषधं मानसिक, शारीरिक व्याधी आणि विशेष करून लैंगिक आजारावरील उपचारासाठी वापरली जातात. साखरेचा पाक आणि काही वनस्पती यांच्यासोबत एम्बेग्रेसला मिसळून ‘माजून मुमसिक मुक्कावी’ नावाचं औषध तयार केलं जातं. लैंगिक क्षमता कमी झालेल्‍या  रुग्णांना हे औषध दिलं जातं. त्यामुळे त्याची लैंगिक क्षमता वाढते. आता काही संशोधक असं म्हणतात की, एम्बेग्रेस लैंगिक क्षमता वाढवतो, हे अजून सिद्ध झालेलं नाही. 

कुत्र्यांच्‍या मदतीने एम्‍बेग्रेसचा शाेध…

स्पर्म व्हेलने उलटी केल्यानंतर ती समुद्र किनारी येण्यासाठी बरीच वर्ष लागतात. समुद्रातील वादळी वाऱ्यामुंळे ही उलटी हजारो किलोमीटरचा प्रवास करून किनाऱ्यावर पोहोचते. ही उलटी जितकी जुनी तितकी त्याची किंमत जास्त असते. याचा वास कुत्र्यांना येतो. त्यामुळे किनाऱ्यावरील लोक विशेष कुत्री सांभाळतात. कधी-कधी मच्छीमारांनाही एम्बेग्रेस मिळतं. चीन आणि अरेबियन देशांमध्ये एम्बेग्रेस मोठ्या प्रमाणात विकत घेतलं जातं. असं असलं तरी युरोप, अमेरिका, पाश्चिमात्य देशांमध्ये या माशांच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. 

माशाच्या उलटीचं प्रकरण समोर कसं आलं? 

भारताच्या समुद्र किनारपट्टींवर एम्बेग्रेसची मोठी तस्करी होते. त्यात केरळ, ओडिशा आणि गुजरात प्रामुख्याने येतात. गुजरातला तब्बल १६०० किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. त्यामुळे तिथे समुद्री प्राणी आणि त्यांच्या अवयवांची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार १९८६मध्ये ‘स्पर्म व्हेल’ हा संरक्षित जीव आहे. त्यामुळे सहाजिक त्याची किंवा त्याच्या अवयवांचा व्यापार बेकायदेशीर आहे. काही लोक एम्बेग्रेस घेऊन अहमदाबाद येथे येणार आहेत, अशी माहिती अहमदाबादच्या झोन-७ च्या पोलिसांना मिळाली होती. त्‍यांनी सापळा रचला आणि तीन जणांना अटक केली. त्यांच्याकडे एम्बेग्रेस आढळलं. आणखी एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडे साडेपाच किलो एम्बेग्रेस आढळून आलं. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ७कोटींच्या घरात आहे.

 

Back to top button