Rahul Bajaj : दुचाकींना पोहोचवले जगात उच्च स्थानावर | पुढारी

Rahul Bajaj : दुचाकींना पोहोचवले जगात उच्च स्थानावर

राहुलकुमार बजाज (Rahul Bajaj) पद्मभूषण, भारताच्या दुचाकी, तीनचाकी वाहनांना जगात उच्च स्थानावर घेऊन जाणारा आणि खर्‍या अर्थाने भारतातच नव्हे, तर आशिया खंडात सार्वजनिक वाहतूक वाहने घेऊन येणारा एक थोर उद्योजक, विचारवंत, व्यवस्थापक नेता आज काळाच्या आड गेला.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणानंतर भारतीय उद्योगांसाठी स्थापित केलेल्या बॉम्बे क्लबच्या माध्यमातून भारतीय उद्योगाला परदेशी उद्योगाच्याच पातळीवर उद्योग करता यावा म्हणून सरकारशी लढणारा, सदैव प्रयत्नशील असणारा आणि आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे, विचारांमुळे अनेकांची टीका ओढवून घेऊन आपल्या मतांशी, विचारांना धरून राहिलेला हा उद्योजक नेता नेहमीच एक वादळी व्यक्तिमत्त्व राहिला. खरेतर आज आपण जे पुन्हा ‘मेक इन इंडिया’ या धोरणाचा पुनरुच्चार आणि स्वीकार करीत आहोत, ते विचार जागतिकीकरणाच्या सुरुवातीलाच या दूरदर्शी उद्योजकाने ठामपणे मांडले.

भारतीय उद्योग हा नेहमीच त्यांच्या केंद्रस्थानी राहिला. उद्योग, त्यास हव्या असणार्‍या सुविधा, सवलत आणि उद्योगाच्या प्रगतीकरिता ते नेहमीच बोलते राहिले. सरकार, सरकारची धोरणे, याचे ते नेहमीच एक कडवे टीकाकार राहिले.

राहुल बजाज यांनी सेंट स्टिफन कॉलेज नवी दिल्ली येथून अर्थशास्त्रातील पदवी, मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी, अमेरिकेतील जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्या वेळच्या बजाज टेम्पोमध्ये श्री. एच. के. फिरोदिया यांच्या नेतृत्वाखाली एक साधारण अधिकारी म्हणून त्यांनी काम सुरू केले. नंतर त्यांनी एन. के. फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली 1968 मध्ये बजाज ऑटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. 1972 साली ते बजाजचे कार्यकारी संचालक आणि संचालक मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कारकिर्दीत सत्तर आणि ऐंशीच्या दशकात बजाज ऑटोने भरपूर प्रगती केली.

चेतक, बजाज सुपर या अनेक प्रसिद्ध दुचाकी वाहनांची निर्मिती त्यांनी केली. त्याचप्रमाणे त्यांनी प्रथम कावासाकी बजाज व नंतर आरटीझेड व इतर मोटारसायकलची शृंखला भारतीय बाजारात आणली.

त्यांच्याच नेतृत्वाखाली याच काळात संशोधन, विकास इत्यादीवर भर देऊन बजाजची उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचवली. एप्रिल 2021 मध्ये ते बजाजच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेऊन अध्यक्ष म्हणून राहिले.

राहुलकुमार हे भारतीय उद्योगाचे नेते होते आणि या नेतृत्वानेच त्यांना सी. आय. आय. या राष्ट्रीय उद्योग चेंबरचे अध्यक्षपद 1979 साली बहाल केले. त्यांना सी. आय.आय.चे अध्यक्षपद पुन्हा एकदा 1999-2000 या काळात भूषवावे लागले. ते सोसायटी फॉर इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचेसुद्धा अध्यक्ष होते. पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरचे ते 1980 ते 1982 या काळात अध्यक्ष होते. त्यांना 2001 साली ‘पद्मभूषण’ हा किताब देण्यात आला.

राहुलजी हे राज्यसभेचे सक्रिय सभासद राहिले व त्याचप्रमाणे इंटरनॅशनल बिझनेस कौन्सिल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचेसुद्धा ते अध्यक्ष होते. 1986 ते 1989 साली त्यांनी इंडिअन एअरलाईन्सचे अध्यक्षपद भूषविले. खासगी क्षेत्रातून अध्यक्षपद भूषविणारे बहुतेक ते पहिलेच होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पुणे ते दिल्ली ही पहिली विमानसेवा सुरू केली. पुणे विमानतळावरून देशाच्या राजधानीला व पुण्यातून महाराष्ट्राच्या बाहेर जाणारी ही पहिलीच विमानसेवा होती आणि त्याकरिता समस्त पुणेकर नेहमीच त्यांचे ऋणी राहतील.

राहुल बजाज यांनी भारतातील सी. एस. आर.कायदा यायच्या आधीपासून उद्योगाची सामाजिक बांधीलकी व त्याचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी प्रकल्प भारतभर राबविले. जमनालाल फाऊंडेशन हे कदाचित भारतातील एक सर्वांत मोठे सामाजिक कार्य करणारे फाऊंडेशन असेल.

आज नॉनबँकिंग फायनान्स या क्षेत्रातील प्रथम क्रमांकाची कंपनी बजाज फायनान्सचे जनक म्हणजे राहुल बजाज. त्यांच्या काटेकोर, सक्त धोरणांवर उभारलेली ही कंपनी आज सर्वांच्याच कौतुकाचा विषय झाली आहे.

माझ्या स्वतःच्या अनुभवातील एक अलीकडची घटना म्हणजे त्यांचा स्पष्टवक्तेपणा व तत्त्वांना महत्त्व देण्याच्या स्वभावाची चांगली उदाहरणे आहेत. मला एका संस्थेच्या अध्यक्षांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त बजाजसाहेबांकडून प्रतिक्रिया मिळविण्यासाठी विनंती करण्यात आली. आधी मी नकार दिला. परंतु, नंतर फारच आग्रह झाल्यामुळे मी बजाजसाहेबांशी बोललो. त्यावर त्यांनी मला मराठी येत नाही आणि मी मराठीत प्रतिक्रिया देणे नक्कीच विचित्र वाटेल व दुसरे म्हणजे मी या गृहस्थांना फारसे भेटलेलो नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल लिहिणे माझ्या तत्त्वात बसत नाही, अशा स्पष्ट शब्दांत सांगितले.

मला त्यांच्या आकुर्डीच्या मोठ्या ऑफिसमधील ती संध्याकाळ अजून चांगलीच लक्षात आहे. आपले अनेक अनुभव व काम याबद्दल सांगताना त्यांनी मला एक चांगला मंत्र दिला. ते म्हणाले की, निवृत्ती घेणार्‍या माणसाला मी शहाणा कधीच म्हणणार नाही. आपण एका कामातून, व्यवसायातून जरी बाजूला झालो, तरी आपण दुसर्‍या कुठल्या तरी कार्यात कार्यमग्न होणे, हेच शहाणपण आहे.

हीच कामाची ऊर्जा राहुल बजाज (Rahul Bajaj) यांना सदैव कार्यरत, कार्यमग्न ठेवत आली. आज जरी ते आपल्यातून गेले असले, तरी त्यांच्या स्मृती उद्योगात, समाजात सदैव राहतील.

– डॉ. अनंत सरदेशमुख,
माजी महासंचालक,
मराठा चेंबर, बजाज कर्मचारी

Back to top button