

पुढारी ऑनलाईन: येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 2014 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 90 डॉलरच्या वर गेली आहे.
सध्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. 2022 या नवीन वर्षामध्ये मध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या पाच आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, कोविड महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर आणि मागणी वाढल्यामुळे कच्च्या तेलाच्या मागणीत प्रचंड वाढ होईल, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. Goldman Sachs च्या मते, 2022 मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलर पर्यंत पोहोचू शकते. 2023 मध्ये प्रति बॅरल 105 डॉलरच्या च्या पुढे जाऊ शकते. त्याचवेळी, जेपी मॉर्गन या संस्थेने 2022 मध्ये कच्च्या तेलाची किंमत 125 डॉलर प्रति बॅरल आणि 2023 मध्ये प्रति बॅरल 150 डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
डिसेंबर 2021 मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 68.87 डॉलर होती. जी आता प्रति बॅरल 90 डॉलरच्या वर पोहचली आहे. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांना आता कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी जास्त किंमत मोजावी लागत आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या कंपन्यांनी दीड महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि सरकारच्या दबावामुळे कच्च्या तेलाच्या दरात सुमारे 30 टक्के वाढ होऊनही सरकारी तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ करत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेल कंपन्यांनी जानेवारी २०२२ मध्ये हवाई इंधनाच्या किमती दोनदा वाढवल्या आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. सरकारी तेल कंपन्या आता दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा आढावा घेतात, परंतु राजकीय कारणांमुळे आणि सरकारच्या दबावामुळे ते आता वाढवू शकत नाहीत. पेट्रोल-डिझेलचे दर ठरवण्याचे अधिकार सरकारी तेल कंपन्यांना दिलेले असले तरी सरकारी हस्तक्षेपातून त्या कधीच बाहेर पडू शकलेल्या नाहीत. म्हणजेच 10 मार्च 2022 रोजी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच सर्वसामान्यांना पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीव किमतीचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भारतासाठी 26 जानेवारी 2022 रोजी कच्च्या तेलाची सरासरी खरेदी किंमत प्रति बॅरल 88.23 डॉलर होती. तर ऑक्टोबरमध्ये सरकारी तेल कंपन्यांना सरासरी 74.85 डॉलर प्रति बॅरल, नोव्हेंबरमध्ये 74.47 डॉलर प्रति बॅरल आणि डिसेंबरमध्ये 75.34 डॉलर प्रति बॅरल दराने कच्चे तेल खरेदी करावे लागले.
पेट्रोल डिझेल किती महाग होणार ?
कच्च्या तेलाच्या दरात प्रत्येक डॉलरच्या वाढीमुळे सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 40 पैशांनी वाढवतात. 1 डिसेंबर 2021 मध्ये कच्चा तेलाचा दर प्रति बॅरल 68 डॉलर वर पोहचला होता. सध्या कच्चा तेलाचा दार हा ८८ डॉलर प्रति बॅरल आहे. याचाच अर्थ असा कि ५० दिवसांत २० डॉलरने कच्चे तेल महाग झाले. साधारणतः कच्च्या तेलाच्या दरात ५ डॉलरपर्यंत वाढ झाल्यानंतर पेट्रोल डिझेल २ रुपयांनी होते. रुपयाच्या तुलनेत डॉलरममध्ये आलेली कमजोरीही जोडली तरी सरकारी तेल कंपन्यांना त्यांचा तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किमान 5 रुपयांनी वाढ करावी लागेल. मात्र निवडणुकीमुळे त्यांचे हात बांधलेले आहेत. निवडणुका संपल्यानंतर तेल कंपन्यांना अपेक्षित असणारी ही दर वाढ होण्याची शक्यता आहे.
मागणी असूनही तेल उत्पादक देश कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवत नाहीत, ज्यामध्ये त्यांनी 2020 मध्ये कोरोनाच्या आगमनानंतर कपात केली होती. मागणी-पुरवठा यांच्यातील प्रचंड तफावत आणि बाधित झालेला पुरवठा यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. 2 फेब्रुवारी 2022 रोजी तेल उत्पादक देशांची बैठक होणार असून त्यात उत्पादन वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर कझाकिस्तान आणि लिबियातील संकटामुळे अडचणी वाढत आहेत.